ETV Bharat / state

केजमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या एकाला अटक; तिघे जण फरार

author img

By

Published : Jul 29, 2020, 7:44 AM IST

kej forest officer
केजमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या एकाला अटक; तिघे जण फरार

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लाखा शिवारात हरणाची शिकार झाल्याची माहिती धारूर वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. मुंडे यांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यांनी शिकारीच्या साहित्यासह आरोपीला जेरबंद केले.

बीड - केज तालुक्यातील लाखा गावच्या शिवारात मंगळवारी एका व्यक्तीला हरणाची शिकार करताना वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. इतर तिघे यावेळी फरार झाले. अधिकाऱ्यांनी हरणाचे मांस व इतर शिकारीचे साहित्य देखील जप्त केले आहे. भास्कर कल्याण काळे असे हरणाची शिकार करताना पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. मुंडे यांनी दिली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लाखा शिवारात हरणाची शिकार झाल्याची माहिती धारूर वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. मुंडे यांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यांनी शिकारीच्या साहित्यासह आरोपीला जेरबंद केले. मात्र, तीन आरोपी फरार झाले. बीड जिल्ह्यातील डोंगर पट्ट्यांमध्ये हरणांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आतापर्यंत हरणाची शिकार करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अनेक वेळा वन विभागाकडून देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेले आहे. मात्र, मंगळवारी अधिकारी एम. एस. मुंडे यांनी हरणाच्या शिकारी संदर्भातील माहिती मिळताच आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपीला पकडले आहे. ही कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकामध्ये वनरक्षक एल. जी. वरवडे, एस. ए. मोराळे, संभाजी पारवे, वाहन चालक शाम गायसमूद्रे यांचा सहभाग होता.

बंद खोलीत ठेवले होते हरणाचे मांस-

आरोपींनी हरणाची शिकार करून मांस एका बंद खोलीत ठेवले होते. वन विभागाच्या पथकाने सर्वत्र झाडाझडती केली असता, एका बंद खोलीमध्ये शिकारीचे साहित्य व हरणाचे मांस आढळून आले. पथकाने तत्काळ मुद्दे मालासह आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी इतर तीन आरोपी फरार झाले. या प्रकरणी वन्य जीव संरक्षण अधिनीयम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विभागीय वन अधिकारी एम. बी. तेंलग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी मुंडे हे पुढील तपास करत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.