ETV Bharat / state

#GroundReport : दत्तक घेतलेल्या 'धसवाडी'त पंकजा मुंडे एकदाही फिरकल्या नाहीत...

author img

By

Published : Sep 19, 2019, 3:20 PM IST

Updated : Sep 24, 2019, 2:40 PM IST

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत:च्या परळी मतदारसंघातील धसवाडी हे गाव 'आदर्श आमदार ग्राम' योजनेअंतर्गत विकासासाठी दत्तक घेतले आहे. मात्र, या गावात सिमेंटच्या रस्त्यांव्यतिरिक्त कोणताही विकास झाला नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे. पाहा 'ईटीव्ही भारत'चा हा ग्राऊंड रिपोर्ट...

आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या धसगावचा 'ग्राऊंड रिपोर्ट'

बीड - 'युती सरकारच्या काळात 2014 नंतर केवळ बीड जिल्ह्यात हजार कोटीचा विकास निधी आणला', अशा वल्गना मंत्री पंकजा मुंडे नेहमीच जाहीर कार्यक्रमात करतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबवण्यात येणाऱ्या आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आमदारांनी विकासासाठी दत्तक घेतलेल्या गावांची व्यथा अत्यंत बिकट आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत:च्या परळी मतदारसंघातील धसवाडी हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावात सिमेंटचे रस्ते वगळता इतर कोणताही विकास झाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या धसगावचा 'ग्राऊंड रिपोर्ट'

या गावात दिवसातून एकदाच बस येते. धसवाडीच्या जवळपास कोणताही सिंचन प्रकल्प नसून, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचीही सोय नाही. गावात सध्या एकही वाचनालय नाही. तरुणांमधील रोजगाराची समस्या उग्र झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील 3 खोल्यांमध्ये एकूण 5 वर्ग भरत आहेत.

धसवाडी गावची लोकसंख्या जवळपास हजार-बाराशे दरम्यान आहे. गावात 5 वी पर्यंत शाळा आहे. मात्र, केवळ 3 वर्ग खोल्यांमध्ये एकत्र अभ्यास करण्याची वेळ विध्यार्य़ांवर ओढवली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील एका खोलीतून धसवाडी ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच खासदार निधीतून गावात रस्ते मात्र, चकाचक झाले आहेत.

पाण्यासाठी फिल्टर नसल्याने अशुद्ध पाण्यावरच धसवाडीची मदार

काही सार्वजनिक विहिरींमधून गावाला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे अशुद्ध पाण्यावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी फिल्टर करण्यासाठी यंत्रणा बसवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केली आहे.

75% शेतकरी पीक विम्यापासून वंचित

धसवाडी येथील शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान, गावातून जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांनी 2018 साठी पीक विमा भरल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यातील केवळ निम्म्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळाला आहे. यासाठी शेतकरी बँकेत फेऱ्या मारत आहेत. मात्र,अद्यापही विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

काही कामे मंजूर; काही अद्याप प्रतिक्षेत

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या धसवाडीत मोठ्या प्रमाणात सुविधांची वानवा आहे. मात्र,काही कामे मंजूर झालेली आहेत. यामध्ये स्मशानभूमी, खुली व्यायाम शाळा, महिलांसाठी ग्रामसंघ कार्यालय, अभ्यासिका खोली तसेच नाना- नानी पार्क मंजूर आहे. परंतु, अद्यापही हे प्रकल्प कागदोपत्री आहेत.

दिवसातून एकच वेळ एसटी

दळणवळणासाठी सरकारने रस्ते चकचकीत केले आहेत. मात्र, धसवाडीमध्ये सकाळी एकदाच एस. टी. बस येते. यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात एकदाच बस येत असल्याने सायकल अथवा खासगी वाहनांनी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत असल्याचे गावातील तरुणांनी सांगितले. अनेक तरुण महाविद्यालयीन शिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील किनगाव अथवा अहमदपूर येथे शिक्षण घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाच वर्षात आमदार निधीतून 6 लाखांची मदत

या गावात मागील पाच वर्षात आमदार निधीतून फक्त एका रस्त्यासाठी 6 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे खर्च करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कोणताही रक्कम आमदार निधीतून खर्च झालेली नाही. उर्वरित रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून दोन सिमेंट बंधारे बांधण्यासाठी 10 लाख 50 हजार रुपये निधी खर्च झाल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. गावातील पाणीपुरवठा योजना 2014 पूर्वीच पूर्ण झाली असून, गावकरी अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.