ETV Bharat / state

दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे

author img

By

Published : Apr 7, 2021, 4:26 PM IST

दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक आहे, या मुळे प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Dhananjay Munde has appealed to the people to follow the rules as the number of corona patients is increasing day by day
दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे

बीड - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सिजन/व्हेंटिलेटर्स उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता भासणार नाही, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना जिल्ह्याच्या जनतेने नियमांचे पालन करून व आवश्यक काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

सर्वत्र आरोग्य दूत आपले प्राण पणाला लावून कोरोना परिस्थितीशी लढा देत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, तसेच पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हावासीयांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.