ETV Bharat / state

किरकोळ कारणातून तरुणाचा खून, 24 तासांच्या आत आरोपी अटकेत

author img

By

Published : Jan 12, 2021, 10:19 PM IST

बीड बातमी
बीड बातमी

बीड शहरातील अंकुशनगरात शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बीड - शहरातील अंकुशनगरात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.11) घडली होती. या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत अटक केली.

प्रकाश बळीराम गायकवाड ( वय 30 वर्षे, रा. डिग्रस ता. गेवराई, हल्ली मुक्काम कपिलमुनी मंदिरापाठीमागे, अंकुशनगर, बीड) हा एका व्यापाऱ्याकडे वाहनचालक म्हणून काम करत होता. 10 जानेवारील सायंकाळी साडेसात वाजता त्याला त्याचा मित्र महादेव सर्जेराव शिंदे (30 वर्षे, रा. शिंदेवस्ती, अंकुशनगर, बीड) याने फोन करुन दारू पाज, असे म्हणत बाहेर बोलावून घेतले. दरम्यान, एका धाब्यावर त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते घराकडे येत होते. मात्र, सोबत आणलेली दारू पिण्यासाठी ते रस्त्यात थांबले. तेथे दारु पिताना त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ झाल्याने हा वाद चिघळला. प्रकाशने महादेवला दगड फेकून मारला, यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. याचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या महादेव शिंदेने जवळ पडलेला दगड उचलून प्रकाशच्या डोक्यात घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत प्रकाशची पत्नी ज्योती यांच्या तक्रारीवरुन महादेव शिंदे विरुध्द शिवाजीनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, आरोपी महादेव शिंदेला मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.

दुचाकी घसरुन अपघात

प्रकाश गायकवाडला संपविल्यानंतर महादेव शिंदे याने दुचाकीवरुन रौळसगाव (ता.बीड) गाठले. तेथे नातेवाईकांना पैशांची मागणी केली. पण, तो नशेत असल्याने नातेवाईकांनी त्यास थारा दिला नाही. त्यामुळे तो दुचाकीवरुन बीडकडे परतत होता. मांजरसुंब्याजवळ त्याची दुचाकी घसरली व तो खाली कोसळला. यात त्याला दुखापत झाली. काही लोकांनी त्यास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले.

पिंपळनेर परिसरातून आवळल्या मुसक्या

उपचार घेताना पहाटे महादेव शिंदे शुध्दीवर आला. त्याने जिल्हा रुग्णालयातून पलायन करत मांजरसुंबा गाठले. तेथून दुचाकी घेऊन तो पलायनाच्या प्रयत्नात होता. पिंपळनेर (ता.बीड) येथे एका मित्राकडे 20 हजार रुपये घेऊन तो पळून जाणार होता. याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत यांना मिळाली. त्यांनी पथक रवाना केले. त्यानंतर त्यास पिंपळनेर येथून ताब्यात घेतले.

हेही वाचा - बीड : शॉर्टसर्किटमुळे साडेआठ एकर ऊस जळून खाक; माजलगाव तालुक्यातील घटना

हेही वाचा - अखेर ' त्या ' कावळ्यांचा मृत्यू ' बर्ड फ्ल्यू ' मुळेच; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.