ETV Bharat / state

Gunaratna Sadavarte News : स्वतःची कार जाळणाऱ्या 'त्या' मराठा कार्यकर्त्यानं फोडली सदावर्तेंची कार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 1:08 PM IST

Updated : Oct 26, 2023, 2:20 PM IST

Gunaratna Sadavarte News : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्यानं खळबळ उडाली होती. गाडीच्या काचा फोडणाऱ्याचं नाव आता समोर आलंय.

Gunaratna Sadavarte News
Gunaratna Sadavarte News

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Gunaratna Sadavarte News : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा मराठा आंदोलनातील कार्यकर्ता मंगेश साबळे आणि त्याच्या मित्रांनी फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणारा मंगेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. दोन महिन्याआधी मराठा समाजाच्या पुकारलेल्या बंद मध्ये त्यानं स्वतःची कार जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला होता, तर त्याआधी परिसरातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चक्क दोन लाख रुपये तहसील कार्यालयात उधळत सरकारी अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला होता. आपल्या आंदोलन करण्याच्या पद्धतीमुळं तो परिसरात चांगला चर्चेत राहिला होता, तर आजच्या कृतीमुळं राज्यभर त्याच्या आंदोलनाची दखल घेतली जात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाळली होती स्वतःची कार : मंगेश साबळे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावाचा सरपंच आहे. सुरुवातीला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. मात्र नंतर त्यानं राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाला सुरुवात केली. मात्र तिथं देखील तो जास्त रमला नाही आणि गेल्या वर्षभरापासून तो फक्त सरपंच म्हणून गावाचं कामकाज पाहात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात तो सक्रिय आंदोलक म्हणून काम करतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणा दरम्यान अंतरवाली सराटी इथं पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान फुलंब्री तालुक्यात सरकारचा निषेध व्यक्त करत असताना मंगेश साबळे यानं स्वतःची नवीकोरी कार जालळी होती. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांवर आलेला त्याचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत राहिला होता.

याआधी देखील केली आहेत आक्रमक आंदोलने : सामान्य कुटुंबातून आलेल्या मंगेश साबळे यानं आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली आहेत. हटके आंदोलन केल्यामुळं समाज माध्यमांवर त्याला चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळाली. याआधी फुलंब्री येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना अनुदान मिळत नसल्यानं त्यानं तहसील कार्यालयातच अधिकारी पैसे मागतात असा आरोप करत, गळ्यात पैश्यांची माळ घालून दोन लाख रुपये उधळले होते. त्यावेळी त्याचे व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले होते. प्रहार संघटनेत असताना त्यानं तलावाच्या मधोमध बोटीमध्ये बसून तर कधी मोबाईलच्या टॉवरवर चढून आक्रमक आंदोलन केली होती. त्यात आता गुणरत्न सदावर्ते यांच्या कारच्या काचा फोडून त्याने केलेलं आंदोलन पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालाय.

हेही वाचा :

  1. Gunaratna Sadavarte News: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड, मनोज जरांगे यांना अटक करण्याची सदावर्तेंची मागणी
  2. Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
  3. Maratha Kranti Morcha: आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात राजकीय नेत्यांना बंदी; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका...
Last Updated : Oct 26, 2023, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.