ETV Bharat / state

Water Shortage in Heavy Rain : मुसळधार पावसातही पाणीटंचाई; अमरावतीच्या मेळघाटातील भीषण वास्तव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 2:22 PM IST

Water Shortage in Heavy Rain
Water Shortage in Heavy Rain

Water Shortage in Heavy Rain : अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय. या भागातील महिलांना उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही पाण्यासाठी डोंगरदर्‍यातून पायपीट करावी लागते.

मुसळधार पावसातही पाणीटंचाई; अमरावतीच्या मेळघाटातील भीषण वास्तव

अमरावती Water Shortage in Heavy Rain : ढगाळ वातावरणामुळे भर दुपारी ही अंधारलेले वातावरण आणि मुसळधार पाऊस बरसत असताना दूर जंगलातून पायपीट करीत पिण्यासाठी पाणी आणणाऱ्या महिला असं आश्चर्यकारक मात्र तितकंच वेदनादायी दृश्य सातपुडा पर्वत रांगेतील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भर पावसात पाहायला मिळतं. उन्हाळ्यात पाण्यासाठी डोंगरदर्‍यातून पायपीट करणाऱ्या या महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष भर पावसाळ्यातही तितकाच गहन असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय.

पावसाळ्यातही पाणी नसल्याचं कारण काय : देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष उलटली असतानाही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अनेक प्रश्न शेकडो वर्षांपासून तसेच कायम आहेत. मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील 24 गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही. ज्या भागात वीज पोहोचली नाही त्याठिकाणी 2017-18 या वर्षात सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे प्रत्येक घरात एक लाईट आणि एक पंखा कसाबसा सुरू झाला होता. सौरऊर्जेच्या माध्यमातूनच गावालगत असणाऱ्या विहिरीतून किंवा कूपनलिकेतून पाण्याची पाईप टाकून गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत साठवलं जातं. या टाकीतून प्रत्येक घरासमोर असणाऱ्या नळाला पाणी येतं. हे सारं काही सुरळीत वाटत असलं तरीही पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळं मेळघाटात सौरऊर्जा पूर्णतः निकामी होते. त्यामुळं या गावांत शंभरच्यावर नळ लागले असले तरी त्यात पाणीच येत नसल्यामुळं भर पावसात गावातील महिलांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळविण्यासाठी जंगल खोऱ्यात पायपीट करावी लागते.

कोणत्या गावात भीषण पाणीटंचाई : मेळघाटात प्रचंड पाऊस कोसळतो. मात्र, हा संपूर्ण पाऊस उंच डोंगरावरून खाली नदी नाल्यांद्वारे वाहून जातो. यामुळं कितीही पाऊस बरसला तरी मेळघाटात पावसाचं पाणी अडवून ठेवणारी यंत्रणाच नसल्यामुळं या भागातील आदिवासी बांधवांच्या गावात बाराही महिने पाण्याची टंचाई भेडसावते. पावसाळ्यात काही गावांची पाण्याची समस्या मार्गी लागत असली, तरी धारणी तालुक्यातील चोपण, खामदा, किनी खेडा, रंगूबेली, कुंड, ढाकणा, पिपल्या, टेंभू, रक्षा, कोकमार यासह चिखलदरा तालुक्यातील सुनिता, भवई, सावरखेडा, मरिता, खुशिदा, बिच्छू खेडा, नवलगाव, मारीझडप, चुनखडी, रायपूर, खरीमल बोरीटाखेडा, रेट्याखेडा, माखला, बिबा, चौबिता अशा गावांत वीज पुरवठा नसल्यामुळं आणि सौरऊर्जा असली तरी पावसाळ्यात ती निकामी ठरत असल्यामुळं या भागातील नागरिकांना पिण्यासाठी प्रचंड कष्टानं पाणी मिळवावं लागतं.


2021 च्या अर्थसंकल्प अधिवेशनात गाजला होता मुद्दा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2021 मध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी मेळघाटातील एकूण 24 गावांमध्ये आजपर्यंत वीज पोहोचली नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती. या गावांमध्ये वीज जोडणी करावी अशी मागणीही त्यांनी तेव्हा केली होती. असं असतानाही या सर्व गावांमध्ये आजही वीज वितरण कंपनी पोहोचू शकली नाही. महाऊर्जा अर्थात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे या गावांमध्ये घरात एक दिवा आणि पंखा चालेल इतकी व्यवस्था करण्यात आलीय. यासाठी प्रत्येक घराला पन्नास हजार रुपये खर्च महाऊर्जेने केला असला तरी, ही सौर ऊर्जा केवळ नावापुरतीच असून घरात धड उजेडही पडत नाही. तसंच प्रत्येक घरासमोर लावलेल्या नळाला पाण्याचा थेंब नाही अशा वेदना मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या नशिबी आहेत.

हेही वाचा :

  1. Melghat Water Shortage : मेळघाटाला पाणी टंचाईचे चटके; दोन तास हापसल्यावर हंडाभर मिळते पाणी
  2. Amravati Wadali Lake : अमरावतीतील इंग्रजकालीन वडाळी तलाव होतो आहे रिकामा, सहा महिन्यात रूप पालटण्यासाठी 'या' कामांना दिली जातेय गती
  3. Rainfall In Amaravati : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तीन जण वाहून गेल्याने खळबळ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.