ETV Bharat / state

बाजारपेठा-मॉल सुरु, मग रेस्टॉरंट-बार का बंद? बार असोसिएशनचे धरणे आंदोलन

author img

By

Published : Aug 6, 2021, 5:48 PM IST

अमरावती शहरातील संपूर्ण बाजारपेठा, मॉल सुरू झाले आहेत. मात्र, रेस्टॉरंट आणि बारवर निर्बंध आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा रेस्टॉरंट व बार असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Amravati
Amravati

अमरावती - शहरातील संपूर्ण बाजारपेठा, मॉल सुरू झाले आहेत. मात्र, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याबाबत निर्बंध कायम आहेत. त्यामुळे याच्या निषेधार्त आज (6 ऑगस्ट) अमरावती जिल्हा रेस्टॉरंट व बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला आपल्या प्रतिष्ठाणच्या चाव्या सोपवण्यात आल्या. इतर व्यवसायांप्रमाणे रेस्टॉरंट आणि बार सुरळीत सुरू व्हावे या मागणीसाठी रेस्टॉरंट व बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणेही दिले.

रेस्टॉरंट व बार असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष नितीन मोहोड

अनेक कुटुंबांच्या जीवनाचा प्रश्न

'अमरावती जिल्ह्यात कुठलाही रोजगार नाही. अशा परिस्थितीत अनेक कुटुंबे हॉटेल व्यवसायावर अवलंबून आहेत. दीड वर्षांपासून रेस्टॉरंट, बार बंद आहेत. त्यामुळे इथे काम करणाऱ्या स्वयंपाकी, वेटर, भांडी घासणारे, भाजी, किराणा, मटण, चिकन पुरवणारे सर्वच अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे जीवन हॉटेल आणि बारवर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने इतर सर्व व्यवसायाप्रमाणे आमचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी', अशी मागणी रेस्टॉरंट व बार असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष नितीन मोहोड यानी केली.

रेस्टॉरंट-बारमध्ये सर्वाधिक सोशल डिस्टन्सिंग

'आज संपूर्ण शहरात गर्दी झालेली दिसत आहे. मॉलमध्ये पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी आहे. त्या तुलनेत आमच्या रेस्टॉरंट आणि बारमध्ये सर्वाधिक सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळेल. तशी व्यवस्थाच आमच्याकडे आहे. असे असताना आमच्यावर अन्याय केला जात आहे', असा आरोप रेस्टॉरंट व बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आला.

आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

रेस्टॉरंट व बार असोसिएशनच्या आंदोलनाला काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी पाठिंबा जाहीर केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावतीत येताच त्यांच्यासमोर हा विषय मांडू आणि इतर सर्व व्यवसायांप्रमाणे रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती करू, असे आश्वसन यावेळी बबलू शेखावत आणि विलास इंगोले यांनी दिले.

हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला जबर धक्का, बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.