ETV Bharat / state

Waste Disposal Stick : कचऱ्याची विल्हेवाट लावायची? 'ही' घ्या हातात काठी!

author img

By

Published : Aug 12, 2023, 7:03 PM IST

Updated : Aug 12, 2023, 7:08 PM IST

सध्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न सध्या अनेकांना पडतो आहे. परंतु आता अमरावतीचे संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावणारी काठी तयार केली आहे. ही काठी हातात घेऊन आपल्या परिसरातील कचरा सहज साफ करता येतो.

Waste disposal stick
कचऱ्याची विल्हेवाट लावणारी काठी

अमरावतीचे संशोधक डॉ. इंगोले यांनी केले अनोखे संशोधन

अमरावती : आपल्या घराचा परिसर असो किंवा बाहेर कोठेही सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका या शासकीय यंत्रणांद्वारे कचरा उचलण्यासाठी कितीही यंत्रणा राबविली जात असली तरी, जिकडे तिकडे कचरा मात्र आढळतोच. प्रदूषण निर्माण होण्यासाठी कचरा हाच कारणीभूत असून, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अमरावतीचे संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी चक्क एक काठी तयार केली. ही काठी हातात घेऊन आपल्या परिसरातील कचरा सहज साफ करता येतो. स्वच्छ भारत मिशनमध्ये कचऱ्याच्या निर्मूलनासाठी माझा हा या स्वच्छता काठीच्या माध्यमातून छोटासा सहभाग असल्याचे डॉ. व्ही. टी. इंगोले म्हणतात.



अशी आहे स्वच्छता काठी : प्लास्टिकचा पाईप, सायकलची हॅन्ड ग्रीप, साध्या पाईपचा तुकडा, स्क्रू आणि टोकदार खिळ्याचा वापर करून अगदी अल्प खर्चात हा स्वच्छता पाईप डॉ. इंगोले यांनी तयार केला आहे. या स्वच्छता पाईपला त्यांनी "पंच ओ थ्रेश" असे नाव दिले आहे. अनेकदा जमिनीवर निरुपयोगी प्लास्टिक, प्लास्टिकच्या बॉटल, पेपर, खोके, फुले, पाने पडलेली असतात. या स्वच्छता काठीच्या माध्यमातून या काठीच्या टोकावर असणारा लांब टोकदार खिळा या कचऱ्यामध्ये टोचून संकलित करून कचरापेटीत टाकता येतो.

बहुउपयोगी अशी स्वच्छता काठी : स्वच्छता काठीमुळे हा असा कचरा उचलण्यासाठी वाकायची गरज नाही. तसेच हातही खराब करायची गरज नाही. त्याचबरोबर दुर्गंध देखील येत नाही असे डॉ. इंगोले म्हणाले. ही काठी रस्त्याच्या आजूबाजूला बगीच्यात कोठेही नेता येते. वयोवृद्ध व्यक्तीला चालण्यासाठी देखील ही काठी फायदेशीर ठरणारी असून, रस्त्यात गाय, कुत्रा, असे पाळीव प्राणी आडवे आले तर त्यांना हाकलण्यासाठी देखील या कठीची मदत होते. या काठीला खाली उलटी हुक लावली तर झाडावरील फुले, फळे आणि उंचावरील इतर वस्तू सहज तोडता येणे शक्य असून ही काठी बहुउपयोगी असल्याचे देखील डॉ. इंगोले सांगतात.



घरात लाईट लावण्यासाठी जुगाड : अनेकदा घरातला लाईट गेला की, बल्ब उंचावर चढून लावायचा कसा असे घरात एकटेच असणाऱ्या वृद्ध व्यक्तींना प्रश्न पडतो. वृद्धच काय तर अनेक सर्वसामान्य व्यक्ती देखील गेलेला बल्ब काढण्यासाठी आणि दुसरा लावण्यासाठी शेजारच्या एखाद्या तरुणावर अवलंबून असतो. मात्र यावर देखील डॉ. इंगोले यांनी जुगाडू पर्याय शोधला आहे. प्लास्टिकच्या मोठ्या पाईपला होल्डर मधला बल्ब काढता येईल अशा आकाराची प्लास्टिकची बॉटल व्यवस्थित कापून तिला एका स्क्रूने प्लास्टिकच्या पाईपवर पक्की बसवली. या पाईपच्या साह्याने होल्डर मधील बल्ब काढणे अतिशय सोपे जाते आणि गेलेला बल्ब काढल्यावर नवा बल्ब याच जुगाडू तंत्राच्या साह्याने अगदी पटकन लावता देखील येतो.



अशी सुचली संकल्पना : रोज सकाळी फिरत असताना लहान मुली या खाली वाकून कचरा वेचताना दिसतात. त्या मुलींचे आणि त्यांच्यासारख्या अनेकांचे हे नित्याचेच काम आहे. त्या मुलींना असे वाकून आणि खराब अशा कचऱ्याला स्पर्श न करता कचरा कसा वेचता येईल याबाबत बराच विचार केला. ही स्वच्छता काठी आज साधी दिसत आहे. मात्र एकूण तीन प्रयत्नानंतर या काठीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या संशोधनात मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती शाखेचे प्रवीण गुल्हाने तसेच निलेश देशमुख यांची देखील साथ लाभल्याचे डॉ. इंगोले यांनी सांगितले.



डॉ. इंगोले यांचे इतर संशोधन : डॉ. इंगोले यांनी 1967 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यावर 1970 मध्ये वीआरसीइ नागपूर येथून त्यांनी एम टेकची डिग्री मिळवली. 1958 मध्ये त्यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिकल बेल तयार केली आणि त्यांच्या या संशोधनासाठी पेटंट देखील मिळाले. यानंतर डीसी मोटर, इलेक्ट्रिक गन, ऑटो टी मशीन, वेल्थ रेडिओ ट्रांजिस्टर, रेडिओ, ऑटोमॅटिक गन, फॅन रेग्युलेटर, टेबल फॅन, टीव्ही गेम, ऑटोमॅटिक टाईप चार्जर फॉर ट्रान्सफॉर्मर, डायरेक्ट करंट मोटर, इलेक्ट्रिक फ्लॉकिंग मशीन, डिझेल जनरेटर सेट, इलेक्ट्रिक एअर प्युरिफायर, वायफर अँड सर्व डीसी मोटर, इंटरनल इलेक्ट्रोप्लेटिंग मशीन, वोल्टेज रेगुलेटर फॉर रेल्वे जनरेटर या आणि अशा 40 पेक्षा अधिक संशोधनाला पेटंट मिळाले आहे.

हेही वाचा -

  1. Plant Fossils : चंद्रपूरमध्ये 20 कोटी वर्षांहून अधिक जुने वनस्पतींचे जीवाश्म सापडले
  2. Zebra Fish : स्वत:च्या मेंदू आणि हृदयाला इजा झाल्यास स्वत:च दुरुस्त करणारा 'हा' अनोखा मासा
  3. Cancer Drugs For Malaria : कॅन्सरच्या औषधाने मलेरियावर उपचार शक्य? जाणून घ्या नवीन संशोधन
Last Updated : Aug 12, 2023, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.