ETV Bharat / state

'केंद्राने पूरक पोषणसाठी सुधारित आराखड्यानुसार निधी द्यावा'

author img

By

Published : Dec 18, 2020, 8:15 PM IST

Updated : Dec 18, 2020, 9:02 PM IST

maharashtra minister yashomati thakur met union minister smriti irani delhi
मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (शुक्रवारी) केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे भेट घेतली.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी राज्य शासनाने केंद्राकडे सन 2020-21 साठी मार्च 2020 मध्ये 1 हजार 630 कोटी 2 लाख रुपयांचा वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (एपीआयपी) सादर केला होता. मात्र, कोरोना परिस्थिती निर्माण झाल्याने पूरक पोषण कार्यक्रमाची व्याप्ती वाढवावी लागली आहे.

अमरावती - केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमाच्या सन 2020-21 साठी 2 हजार 3 कोटी 91 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (शुक्रवारी) केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोरोना परिस्थितीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुधारित आराखडा करणे भाग पडले असून पूरक पोषण कार्यक्रम सुरळीत ठेवण्यासाठी हा निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतल्यानंतर महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर.

अधिकच्या निधीची करावी तरतूद -

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी राज्य शासनाने केंद्राकडे सन 2020-21 साठी मार्च 2020 मध्ये 1 हजार 630 कोटी 2 लाख रुपयांचा वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (एपीआयपी) सादर केला होता. मात्र, कोरोना परिस्थिती निर्माण झाल्याने पूरक पोषण कार्यक्रमाची व्याप्ती वाढवावी लागली आहे. एप्रिल 2020 पासून पूरक पोषण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या संख्येत 7 लाख 27 हजाराहून अधिकची वाढ झाली असून अधिकच्या निधीची तरतूद करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी सुधारित 2 हजार 3 कोटी 91 लाख रुपयांचा सुधारित वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री इराणी यांच्याकडे सुपूर्त करून त्यास मान्यता देण्याची विनंती केली. राज्य शासनाने या कार्यक्रमासाठी यावर्षी 1 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'त्यावेळी ते कोणाचे चमचे होते?', मुश्रीफ यांची पडळकरांवर टीका

लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ -

कोरोना काळात महानगरांमध्ये काम करणारे मजूर आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाल्याने पूरक पोषणच्या लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली. तसेच काही कुटुंबे राज्यांतर्गत ग्रामीण भागात स्थलांतरित झाली असून ते पूरक पोषण कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. यापूर्वी एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) सेवांचा लाभ घेत नसलेले घटकही आता या योजनेचा लाभ घेत आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सर्व शाळा बंद झाल्यामुळे खासगी शालेय पूर्व अभ्यासक्रमात (प्ले स्कूल) शिकत असलेली 3 ते 6 वर्षे वयोगटातील जी बालके आयसीडीएस सेवांचा लाभ घेत नव्हती. त्यांनाही सध्या पूरक पोषण आहार कार्यक्रमाचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत एप्रिल 2020 पासून 7 लाख 27 हजाराहून अधिकची वाढ झाली आहे, असे सांगून सुधारित आराखड्यानुसार अधिकची तरतूद व्हावी, अशी मागणीदेखील ॲड. ठाकूर यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा, राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद आदी उपस्थित होते.

Last Updated :Dec 18, 2020, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.