ETV Bharat / state

अमरावतीत कोरोनानंतर डेंग्यूचा प्रादूर्भाव; रुग्णलयात हजारोंची गर्दी, शहरात फवारणी

author img

By

Published : Jul 25, 2021, 11:43 AM IST

Updated : Jul 25, 2021, 11:52 AM IST

अमरावती शहरातील अनेक खासगी रुग्णालयात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णापाय तसेच जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. अमरावती शहरासह तिवसा, भातकुली, अचलपूर, धारणी या तालुक्यातही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून तेथील ग्रामीण रुग्णालयातही मोठ्या संख्येत डेंग्यू रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात सध्या हजाराच्यावर डेंग्यू रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

dengue patients increasing in Amravati
अमरावतीत कोरोनानंतर डेंग्यूने काढले डोकेवर

अमरावती - मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या अमरावती जिल्ह्यात आता डेंग्यूने डोकेवर काढले आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने कमी झाले असताना आता शासकीय आणि खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढायला लागले असताना डेंग्यूसह पावसाळ्यातील साथ रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत असून अमरावती शहारत सर्वत्र फवारणी केली जात आहे.

अमरावतीत कोरोनानंतर डेंग्यूने काढले डोकेवर

डेंग्यू रुग्णांची संख्या हजाराच्यावर -

अमरावती शहरातील अनेक खासगी रुग्णालयात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. अमरावती शहरासह तिवसा, भातकुली, अचलपूर, धारणी या तालुक्यातही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून तेथील ग्रामीण रुग्णालयातही मोठ्या संख्येत डेंग्यू रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात सध्या हजाराच्यावर डेंग्यू रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

dengue patients increasing in Amravati
अमरावतीत कोरोनानंतर डेंग्यूने काढले डोकेवर

डेंग्यू अळ्या आढल्यास कारवाई -

पावसाला उशिरा सुरुवात झाली असताना उकाड्यामुळे अनेकांनी कुलर जुलै महिना लागला असतानाही सुरूच ठेवले आहे. अनेकजण कुलरमधले पाणी साफ करत नसल्याने, साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या होतात. तसेच घरावर ठेवलेले दुचाकी वाहनांचे तसेच सायकलच्या टायरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळया होतात. ज्या व्यक्तीचा घरात किंवा घराच्या परिसरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या तर त्या व्यक्तीवर दंडांत्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.

शहरात होते आहे फवारणी -

अमरावती शहरात यशोदा नगर, कल्याण नगर, रुख्मिणी नगर, मुदलियार नगर, विलास नगर या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. अनेक घरात एकाचवेळी दोन रुग्ण असल्याचेही आढळून आले. डेंग्यू रुग्ण वाढायला लागले असताना महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील झोपडपट्टी परिसरात फवारणी अभियान राबविण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व भागात फवारणी केली जाणार आहे.

डॉक्टरांनी दिला सल्ला -

ताप येणे, हातपाय दुखणे, डोकं दुखणे अशी कोणतीही लक्षणे जाणवताच तातडीने तपासणी करावी. घरात विनाकारणचे पाणी साठवून ठेवू नये तसेच मच्छर होणार नाही याची काळजी घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा. स्वच्छता राखणे तसेच डास मुक्त अमरावतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिरुद्ध देशमुख आणि डॉ. विक्रम रोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.

हेही वाचा - नाशकात कोरोनानंतर डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले, ३०० हून अधिक बाधित

Last Updated : Jul 25, 2021, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.