ETV Bharat / state

Amravati News: दोन पिढ्या गेल्या मात्र गावात विकासाचा पत्ता नाही, मेळघाटात मध्य प्रदेशातील बुरहानपूर गावाची व्यथा

author img

By

Published : Apr 17, 2023, 5:35 PM IST

Updated : Apr 19, 2023, 12:58 PM IST

अनेक अडचणी आणि समस्यांनी ग्रस्त असणारा सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट अनेक अर्थाने दुर्लक्षित आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या गावांची परिस्थिती फार बिकट आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात भैसदेही तालुक्यात येणारे बुरहानपूर हे गाव महाराष्ट्रात येणाऱ्या बुलरघाट या गावापासून अगदी 15 ते 20 फूट अंतरावर आहे. दोन्ही गावांची तुलना केली तर थक्क करणारी विषमता पाहायला मिळते. दोन पिढ्या निघून गेल्या मात्र आमच्या गावात विकास मात्र आला नाही, अशी खंत गावातील आदिवासी बांधव व्यक्त करतात.

Burhanpur village
बुरहानपुर गावाची व्यथा

मध्य प्रदेशातील बुरहानपूर गावाची व्यथा

अमरावती : मेळघाटातील बुरहानपूर हे गाव महाराष्ट्रातील परतवाडा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. बुऱ्हाणपूर या गावातील आदिवासी बांधवांना बाजारासाठी परतवाडा अगदी जवळ आहे. मात्र आधार कार्ड, शाळेचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड असे विविध शासकीय कागदपत्र तयार करण्यासाठी, त्यांना 40 किलोमीटर लांब असणाऱ्या मध्य प्रदेशातील भैसदेही या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तसेच जिल्हा पातळीवरील कामासाठी बैतुलशिवाय पर्याय नाही. दुर्दैव म्हणजे भैंसदेही असो किंवा बैतूल येथील शासकीय अधिकारी गावात येऊनही कधीही पाहणी केली नाही. यामुळे गावाची अवस्था अतिशय वाईट असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. मात्र आमच्या गावात अद्यापही वीज नाही, गावात पक्का रस्ता नाही, पाण्याची देखील व्यवस्था नाही. गावात विहीर व्हावी, यासाठी बैतूल येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन सादर केले. आजोबांपासून अनेकदा गावातील समस्या सोडविण्यासाठी बैतूलला जाऊन मागणी केली. मात्र, वडील आणि आजोबा या जगातून निघून गेले. अजूनही आमच्या गावाकडे मध्य प्रदेश सरकारने लक्ष दिले नाही असे, बुरानपूर येथील आदिवासी बांधव सांगतात.

विजेसाठी हवा केवळ एक खांब : बुऱ्हानपूर या गावाला लागून अगदी पंधरा ते वीस फूट अंतरावर महाराष्ट्रात येणारे बुलरघाट हे गाव आहे. या गावात महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अनेकांना घरकुल मिळाले. बुलरघाट येथे आदिवासी बांधवांची टुमदार घरे आहेत. गावात पक्का रस्ता आहे आणि पाण्याची मोठी टाकी तसेच वीज देखील उपलब्ध आहे. बुलरघाट या गावापासून बुरानपूर या गावात वीज पोहोचविण्यासाठी केवळ एक खांब टाकण्याची गरज आहे. मात्र दोन्ही राज्यांच्या अगदी सीमेवर असल्यामुळे बुराहानपूर येथे वीज कोण देणार हा प्रश्न कायम आहे. मध्यप्रदेश सरकारने धारणी तालुक्यात येणाऱ्या मेळघाटातील अनेक गावात वीज दिली आहे. महाराष्ट्र सरकारला केवळ एक खांब उभारून आमच्या गावात वीज देणे शक्य आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र सरकार असो किंवा मध्यप्रदेश सरकार दोघांकडूनही कुठलाच प्रयत्न होत नाही. आम्ही दोन्ही राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे आमच्याकडे महाराष्ट्र असो वा मध्यप्रदेश कोणीही लक्ष देत नाही.

सौर ऊर्जेचे काही खरे नाही : आमच्या गावात सौर ऊर्जेद्वारे वीज देण्याचा प्रकल्प मध्य प्रदेश सरकारने राबवला. अनेकांच्या घरावर सोलर प्लेट लावण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात याचा कसाबसा उपयोग होतो. मात्र दोन-तीन महिन्यातच या सोलर प्लेट काही काम करीत नाही. आम्हाला गावात कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी दोन्ही राज्यांनी या गावात माणसे राहतात याचा विचार करावा, अशी मागणी देखील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.

हेही वाचा: Wadali Lake Water Issue महापालिका प्रशासनाने वडाळी तलावाचे पाणी उफसले उन्हाळ्यात माणसांसह वन्य प्राण्यांवर अन्याय

Last Updated : Apr 19, 2023, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.