ETV Bharat / state

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात गणपती बाप्पाला निरोप

author img

By

Published : Sep 1, 2020, 3:02 PM IST

अकोला शहरातील मानाच्या बारभाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून विसर्जन केले जात आहे.

Ganapati
गणपती

अकोला - गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असलेल्या लाडक्या गणपतीला आज भाविकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना मिरवणुकीची परवानगी न मिळाल्यामुळे गणेश मंडळांनीही शांततेत विसर्जन केले. अनेक भक्तांनी घरातच गणपतीचे विसर्जन केले.

अकोल्यात गणपती बाप्पाला निरोप

अकोला शहरातील मानाच्या बारभाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासन, सामाजिक संघटना आणि नगरसेवकांनी आपापल्या परिसरामध्ये व प्रभागांमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम घाट तयार केले आहेत. परिसरातील नागरिकांनी याच कृत्रीम ठिकाणी गणेशाचे विसर्जन केले. मोर्णा नदीच्या काठी असलेल्या मुख्य गणेश घाटावरही गणेश विसर्जनाची सोय केली होती. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जित झालेल्या मूर्तींचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. जमा केलेल्या मूर्तींचे पूर्णा नदीत विसर्जण करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेची वाहतूक यंत्रणा सज्ज होती. तसेच निर्माल्यही गोळा करण्याचे काम विविध सामाजिक संघटना करत आहेत. मात्र, अनेक गणेशभक्तांनी कोरोनाच्या संकट काळातील नियमांना तिलांजली देत महाप्रसादाचे आयोजन केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.