ETV Bharat / state

सातवा वेतन न दिल्यास सभा चालू देणार नाही; काँग्रेसचा मनपा प्रशासनाला इशारा

author img

By

Published : Feb 4, 2021, 10:43 PM IST

Updated : Feb 4, 2021, 10:58 PM IST

कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

गेल्या 15 ते 18 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घ्यावे व इतर मागण्यांसाठी काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी केले.

अकोला - मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसने आज मनपासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. आगामी सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न केल्यास सभा चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या आंदोलनात काँग्रेस सोबत मनपा कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी केली.

गेल्या 15 ते 18 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घ्यावे व इतर मागण्यांसाठी काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आले. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, सहावा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्या, रजारोखीची रक्कम त्वरित अदा करा, कालबध्द कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन फरकाची रक्कम द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचा मनपा प्रशासनाला इशारा

तसेच सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याना अनुकंपातत्वावर नोकरीचे सामावून घ्या, मनपात समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा, अशा मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांनी केले. आंदोलनात काँग्रेसचे इतर नगरसेवक व पदाधिकारी हेदेखील सहभागी झाले होते.



राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा
कांग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रीय मजदूर काँग्रेसने पाठिंबा दर्शविला. यावेळी या संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यासोबत मनपा कर्मचारी संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने ही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

Last Updated :Feb 4, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.