ETV Bharat / state

धक्कादायक! शिर्डीत सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू

author img

By

Published : Jun 15, 2021, 4:53 PM IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शिर्डीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू
सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू

शिर्डी ( अहमदनगर) - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शिर्डीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब गेल्या काही दिवसांपासून व्यवसायानिमित्त शिर्डीमध्ये स्थाईक झाले आहे. कोरके यांना दोन मुली आहेत. त्यांची लहान मुलगी श्रध्दाला मे महिन्यात अचानक जुलाब आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला उपचारासाठी कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. नाशिकमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते, तिची कोरोना चाचणी करण्यात आली, कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र जेव्हा तीचे रक्त तपासण्यात आले, तेव्हा तिच्या शरिरामध्ये कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. यावरून तिला लक्षणे विरहित कोरोना होऊन गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिला काही केल्या फरक पडत नव्हता.

सहा महिन्यांच्या मुलीचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू

उपचारादरम्यान मृत्यू

उपचारादरम्यान तिच्या चेहऱ्यावर, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही सर्व म्यूकरमायकोसिसची लक्षणे असून, आपण त्यानुसार उपचार करावा असा सल्ला श्रध्दाच्या कुटुंबाला नाशिक येथील डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र म्यूकरमायोकोसिस तिच्या मेंदू आणि नाकात पसरल्याने तिचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

होही वाचा -'केंद्राने राज्याला लसीचे झुकते माप द्यावे' - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.