ETV Bharat / state

'फक्त यज्ञ करून कोरोना बरा होतो असे म्हणत असेलतर चुकीचे'

author img

By

Published : May 24, 2021, 8:54 PM IST

Updated : May 25, 2021, 3:42 PM IST

रामदेव बाबा यांनी जे विधान केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी या परिस्थितीमध्ये असे विधान करणे योग्य नव्हते व आपले विधान चुकले आहे याचा त्यांच्या लक्षात आले आहे. केंद्रातील मंत्री व अनेकांनी त्यांना हे विधान मागे घेण्यास सांगितले आणि त्यांनी हे विधान मागे घेतले आहे, यावरून त्यांना त्यांची चूक समजली आहे. भविष्यामध्ये त्यांच्याकडून असे होऊ नये अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षा आमदार रोहीत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार

अहमदनगर - विलगीकरण कक्षात जर कोणी रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा न देता केवळ होमहवन किंवा यज्ञ करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे. कर्जत येथे पंचायत समितीत कोरोनाबाबत आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्व. वसंतराव झावरे कोविड सेंटर येथे भाजप नेते तथा माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी दाखल रुग्णांना बरे वाटावे यासाठी नुकताच एक विश्वशांती यज्ञ केला होता. यावर अंधश्रद्ध निर्मुलन समितीने टीका करत जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी, आपल्याला याबद्दल अधिक माहिती नाही, असे सांगितले.

बोलताना आमदार पवार

प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघांत विलगीकरण कक्ष निर्माण करून सर्वांना सेवा करण्याची काम करत असतो. पण, यामध्ये विज्ञान समोर ठेवून त्यानुसार उपचार केले पाहिजे. पण, कोणी जर विलगीकरण कक्षात अशा पद्धतीने हे न करता फक्त होमहवन यज्ञ करून कोरोना बरा होईल असे म्हणत असेल तर ते चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, आज अहमदनगर येथे सुजित झावरे यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत स्व.वसंतराव झावरे कोविड सेंटरवर रुग्णांना शासनाने आखून दिलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. प्रार्थना करणे हा गुन्हा असेल तर तो आपण केला असल्याचेही झावरे यावेळी म्हणाले.

बरे झाले रामदेवबाबांना त्यांची चूक समजली

रामदेव बाबा यांनी जे विधान केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी या परिस्थितीमध्ये असे विधान करणे योग्य नव्हते व आपले विधान चुकले आहे याचा त्यांच्या लक्षात आले आहे. केंद्रातील मंत्री व अनेकांनी त्यांना हे विधान मागे घेण्यास सांगितले आणि त्यांनी हे विधान मागे घेतले आहे, यावरून त्यांना त्यांची चूक समजली आहे. भविष्यामध्ये त्यांच्याकडून असे होऊ नये अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षा आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

कर्जत येथे पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये मुलांवर परिणाम होणार असे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने विलगीकरण कक्षामध्ये स्वतंत्र व्यवस्था बाल रोग तज्ज्ञ डॉक्टरांची बैठका व्हेंटिलेटरची व्यवस्था याबाबत सर्व तयारी करण्यात आली असून आणखी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. मात्र, लहान मुलांमध्ये कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्याचे स्वरूप सध्या तरी सौम्य दिसत आहेत. वरिष्ठ मंडळीमध्ये दिसणारे फुप्फुसाचा त्रास किंवा इतर लक्षणे अजून तरी लहान मुलांमध्ये दिसत नाहीत. पण, आपण गाफील राहणार नाहीत परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यानुसार सर्व नियोजन सुरू आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविका व सर्व शिक्षकांची मदत घेणार आहोत. कारण शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून त्यांची माहिती सातत्याने घेत राहतील. तर आशा सेविका घरोघरी जाऊन यावर बारकाईने लक्ष ठेवतील. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने याचा मुकाबला करावयाचा आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओआरएस एनर्जी ड्रिंक्सचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा - अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धेला हात घालू नये - भाजप नेते सुजित झावरे

Last Updated : May 25, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.