D Y Chandrachud Shirdi : 'साईंची शिकवण संपूर्ण मानव समाजासाठी मार्गदर्शक'; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड साईचरणी नतमस्तक

D Y Chandrachud Shirdi : 'साईंची शिकवण संपूर्ण मानव समाजासाठी मार्गदर्शक'; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड साईचरणी नतमस्तक
D Y Chandrachud Shirdi : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी संध्याकाळी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी अभिप्राय बुकात आपलं मत लिहिलं. 'माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस साईंच्या आशीर्वादानं भरलेला असतो', असं त्यांनी नमूद केलं.
शिर्डी D Y Chandrachud Shirdi : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी (१६ सप्टेंबर) शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांना भगव्या रंगाची शाल अर्पण केली. तसेच त्यांनी साईबाबांच्या पादुकांची पूजा केली व आरती केली.
शाल आणि साईची मूर्ती देवून सन्मान केला : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे शनिवारी संध्याकाळी शिर्डीत आले. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानचं अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी चंद्रचूड यांचा शाल आणि साईची मूर्ती देवून सन्मान केला. यावेळी सेक्रेटरी जनरल अतुल कुहेकर, रजिस्ट्रार सर्वोच्च न्यायालय राकेश कुमार, जनरल रजिस्ट्रार मुंबई उच्च न्यायालय अनुजा अरोरा आदी उपस्थित होते.
अभिप्राय बुकात आपलं मत लिहिलं : साईंच्या दर्शनानंतर डी. वाय. चंद्रचूड यांनी साईबाबा संस्थानच्या अभिप्राय बुकात आपलं मत लिहिलं. 'मी शिर्डीला भेट देऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. साईबाबा हे एक दिव्य शक्ती असून साईबाबांची शिकवण ही संपूर्ण मानव समाजासाठी मार्गदर्शक राहिली आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस हा साईंच्या आशीर्वादानं भरलेला असतो', असं त्यांनी नमूद केलं.
राजनाथ सिंह यांनीही भेट दिली होती : गेल्या महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील देखील होते. राजनाथ सिंह यांच्या साईबाबांचं दर्शन घेत पूजा व आरती केली. त्यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी त्यांचा मूर्ती भेट देत सन्मान केला होता.
हेही वाचा :
