ETV Bharat / state

साईबाबा मंदिर परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून रिपोर्टरवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 1, 2021, 1:08 PM IST

Updated : Feb 1, 2021, 1:45 PM IST

reporters
वार्ताहर

कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पदभार घेतल्यापासूनच ते वादग्रस्त राहिले आहेत. सुरुवातीला ग्रामस्थांना बरोबर त्यांनी विविध विषयांवर वाद घातले होते. त्यातून चर्चेत आलेले असताना मंदिरात येणाऱ्यांसाठी सभ्य वेशभूषेचा आदेश काढून ते पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. यादरम्यान राज्य शासनाने ठरवून दिलेल्या भाविक संख्येपेक्षा कितीतरी अधिक पटीने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन केले होते. या सर्व गोष्टीचा त्यांनी मनात राग धरला होता. त्यात नुकत्याच गावकरी प्रवेशद्वारावरून झालेल्या वादाच्या वृत्तांकनावरुन त्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी पूर्वग्रह ठेवून दोघा पत्रकारांसह एका कॅमेरामनवर गुन्हा दाखल केल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकारीपदाचा कारभार घेतल्यापासूनच कान्हुराज बगाटे वादग्रस्त राहिले आहेत. सुरुवातीला ग्रामस्थांबरोबर आणि प्रसारमाध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर वाद घातले होते. दोन महिन्यांपूर्वी साई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी राज्यातील एका वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींसह एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मंदिर परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन म्हणून रिपोर्टरवर गुन्हा दाखल

पत्रकार संतापले -

साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या विलंबाने दाखल केलेल्या या गुन्ह्यामागे सूडाची भावना असल्याचा आरोप शिर्डी पत्रकार संघासह जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण -

याबाबत साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य शासनाच्या आदेशान्वये साईबाबा मंदिर कोविड नियमांचे पालनकरून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावेळी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता समाधी मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थान मंदिराच्या समोर एका वाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी, नितीन ओझा व त्यांचा कॅमेरामन अशा तिघांनीही साईभक्तांच्या मुलाखती घेण्यास व त्याचे थेट प्रक्षेपण करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे मोठी गर्दी झाल्याचा आरोप ठाकरे यांनी फिर्यादीत केला आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुस्थानाजवळ जाऊन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना वृत्तांकन थांबवण्यास सांगितले व तेथून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विरोध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साईबाबा संस्थानने कोविडचे नियम पाळून दर्शन रांग सुरू केली होती. मात्र, मुलाखत आणि थेट प्रक्षेपण या कार्यक्रमामुळे तेथे गर्दी झाल्याने साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याचे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर अचानक साक्षात्कार झाल्याने ठाकरे यांनी आज रोजी फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची माध्यम विरोधी भूमिका स्पष्ट करणारी आहे,असा आरोप माध्यमांचा आहे.

Last Updated :Feb 1, 2021, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.