ETV Bharat / state

सदोष बियाणे प्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करा - अजित नवले

author img

By

Published : Jun 22, 2020, 12:05 PM IST

सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे वितरणासह खतांची राज्यभरातील टंचाई व निविष्ठांचा तुटवडा हे खरिपाच्या तयारीत सरकारी यंत्रणेने निष्काळजीपणा केला असल्याचेच लक्षण आहे. राज्य सरकारने आता तरी याबाबत गांभीर्याने हस्तक्षेप करावा. ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे, त्या शेतांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी केली आहे.

dr ajit nawle
अजित नवले

अहमदनगर - सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे पेरणी वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र, लेखी तक्रार करूनही कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे, असा आरोप किसान सभेचे अजित नवले यांनी केला आहे.

या सर्व समस्या असतानाच राज्यभरातील कृषी सेवा केंद्र दर रविवारी बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात निविष्ठा उपलब्ध होताना अडचणी येत आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील कृषी सेवा केंद्र आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी रविवारी केंद्रे बंद ठेवली जातात. तोंडावर आलेला हंगाम व कोरोनामुळे अगोदरच खंडित झालेली वितरण साखळी पाहता कृषी सेवा केंद्राच्या राज्य संघटनेने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले.

अजित नवले


लॉकडाऊनमुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे खरीप हंगामात खते, बियाणे, औजारे यांचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो, तसेच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो, असा इशारा किसान सभेने हंगामापूर्वीच दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना या संबंधीचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र, तरी पुरेशी खबरदारी घेतली गेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे वितरणासह खतांची राज्यभरातील टंचाई व निविष्ठांचा तुटवडा हे खरिपाच्या तयारीत सरकारी यंत्रणेने निष्काळजीपणा केला असल्याचेच लक्षण आहे. राज्य सरकारने आता तरी याबाबत गांभीर्याने हस्तक्षेप करावा. ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे, त्या शेतांचे तातडीने पंचनामे करावेत. दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी व कृषी सेवा केंद्र अखंडितपणे सुरू राहतील यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.