ETV Bharat / state

अहमदनगर : काँग्रेसच्या अनुपस्थितीत महविकास आघाडीचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

author img

By

Published : Jun 28, 2021, 9:32 PM IST

शिवसेनेने महापौरपदासाठी रोहिणी शेंंडगे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह सेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar latest news
काँग्रेसच्या अनुपस्थितीत महविकास आघाडीचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर - महापौर-उपमहापौर पदासाठी 30 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी शिवसेनेने महापौरपदासाठी रोहिणी शेंंडगे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह सेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक अनुपस्थित होते. अहमदनगर महापालिकेत काँग्रेसला बाजूला ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून यामुळेच काँग्रेसमध्ये मोठी खदखद आहे.

रिपोर्ट

काँग्रेसने उचलला महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज -

अहमदनगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी 30 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली असून सोमवारी पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या शीला दीप चव्हाण यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज नेले आहेत. राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी अर्ज अद्याप घेतलेला नाही. यावेळेसचे महापौरपद हे अनुसूचित जाती-जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील उमेदवार नाही. अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार 29 जून रोजी दुपारी दीड पर्यंत आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर पदासाठी आणखी कोणकोण अर्ज नेणार व तो दाखल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

सेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी अर्ज भरताना उपस्थित -

शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार संग्राम जगताप, संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश भोसले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

'सत्तेच्या चाव्या माझ्याकडे' -

नगरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आले आहेत. शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर, असे मुंबई येथे दोन पक्षांमध्ये झालेल्या बैठकीत ठरले आहे. मात्र, रविवारी नगरमध्ये एका कार्यक्रमात भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेत बाजूला ठेवल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. तसेच भाजपाचे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात भाजपकडे महापालिकेतील सत्तेच्या चाव्या असल्याचे सांगत निवडणुकीतील रंगत कायम ठेवली आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल - नाना पटोले

'राजकारणात अखेरच्या क्षणी काहीही घडू शकते' -

नगर महापालिकेत 2018 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. त्यांची मुदत 30 जूनला संपत आहे. त्याच दिवशी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात महापौरपदाच्या काळात शहरात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विखे पाटील यांनी नगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहाही घडू शकते, असे वक्तव्य करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे सध्या जरी शिवसेनेकडून नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी आज अर्ज भरला असला, तरी त्यांच्या विरोधात आणखी कोणाचा अर्ज येणार, याबाबत नगरकरांमध्ये उत्सुकता आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी सोडले मौन -

महापौर निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची आहे. अद्यापपर्यंत ते महापौर निवडणुकीबाबत काहीही बोलले नव्हते. परंतु, रविवारी त्यांनी मौन सोडले. शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर, असे ठरविले असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. शिवसेनेच्या काही नगरसेवकांशी माझी चर्चा झाली आहे. या दोन्ही पक्षांची समन्वय समिती केली असून तिचे प्रमुखपद स्थायीसमिती सभापती अविनाश घुले पाहतात. ते दोन्ही पक्षांच्या सर्व संबंधित नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक अंतिम क्षणी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमहापौर पदासाठी कोण, संस्पेन्स कायम -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमहापौर पदासाठी 5 जण इच्छुक आहेत. त्यातील गणेश भोसले, विनित पाऊलबुद्धे यांची नावे अगोदरच चर्चेत आहेत. अजून 3 नावे चर्चेत आली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी कोणाचे नाव समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारपर्यंत राष्ट्रवादीचा उपमहापौर पदाचा उमेदवार ठरलेला नव्हता. स्वतः आमदार जगताप यांनी उमेदवार मंगळवारी ठरेल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ऐनवेळी ही संधी काँग्रेसला देऊन सुवर्णमध्य साधला जाणार का, याचीही उत्सुकता आहे.

हेही वाचा - COVID Package कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना केंद्राकडून ६.२८ लाख कोटींची योजना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.