ETV Bharat / sports

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात

author img

By

Published : Mar 10, 2021, 7:38 AM IST

नाणेफेक गमावलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावत १८८ धावांचे विशाल आव्हान उभारले. कर्णधार केव्हिन पीटरसन आणि फिल मस्टर्ड (१४) यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज

रायपूर - कर्णधार केव्हिन पीटरसनच्या (७५) स्फोटक खेळीमुळे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंग्लंड लेजेंड्स संघाने इंडिया लेजेंड्सवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताला ६ धावांनी मात दिली. या स्पर्धेतील इंडया लेजेंड्स संघाचा हा पहिलाच पराभव आहे.

नाणेफेक गमावलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावत १८८ धावांचे विशाल आव्हान उभारले. कर्णधार केव्हिन पीटरसन आणि फिल मस्टर्ड (१४) यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मुनाफ पटेलने संघाला पहिले यश मिळवून दिले. संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पीटरसनने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार लगावले. इंडिया लेजेंड्सकडून युसुफ पठाणने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर, इरफान पठाण आणि मुनाफ पटेलला प्रत्येकी २ बळी घेता आले.

प्रत्युत्तरात इंडिया लेजेंड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. १७ धावांच्या आतच इंग्लंडने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांना माघारी धाडले. त्यानंतर पठाण बंधुंनी सहाव्या गड्यासाठी ४३ धावांची आक्रमक भागादारी रचली. युसुफ पठाण बाद झाल्यानंतर मनप्रीत गोनी आणि इरफान पठाणने शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी केली. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या दोघांनी आठव्या गड्यासाठी २० चेंडूत ५१ धावा कुटल्या. इरफानने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची नाबाद खेळी केली. तर, गोनी ३५ धावांवर नाबाद राहिला. इंडिया लेजेंड्सचा संघ ७ गडी गमावत १८२ धावांपर्यंत पोहोचू शकला.

इंग्लंड लेजेंड्सकडून माँटी पानेसारने ३, जेम्स ट्रेडवेलने २ , हॉगार्ड आणि रायन साइडबॉटम यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. इंडिया लेजेंड्स संघ १२ गुणांसह शीर्षस्थानी आहे. इंग्लंडचा दोन सामन्यांमधील हा सलग दुसरा विजय आहे आणि ८ गुणांसह ते आता तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा - आयपीएल : महेंद्रसिंह धोनीची प्रशिक्षणाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.