ETV Bharat / sports

IND vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला चारली धूळ, गोलंदाजांनी मोडले वेस्ट इंडीजच्या फलंदाजांचे कंबरडे

author img

By

Published : Jul 28, 2023, 8:17 AM IST

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघावर विजय मिळवला आहे. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना 114 धावांवर रोखत चांगला खेळ केला. दुसरीकडे 115 धावांचे लक्ष्य गाठायला भारतीय संघाला कसरत करावी लागली.

IND vs WI
संपादित छायाचित्र

बार्बाडोस : भारत आणि वेस्ट इंडीज संघादरम्यान बार्बाडोस मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीज संघाला धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने भारतीय संघासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र 115 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजाला मोठी कसरत करावी लागली. भारतीय संघाने 5 बळी गमावत वेस्ट इंडीजच्या संघावर विजय संपादन केला. तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीज संघाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. भारतीय संघाकडून खेळताना कुलदीप यादवने 4 तर रविंद्र जडेजाने 3 बळी घेतले.

वेस्ट इंडीजचा संघ ढेपाळला : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय फिरकूपटूंनी वेस्ट इंडीज संघाचे कंबरडे मोडले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडीजचा संघ 114 धावातच गारद झाला. वेस्ट इंडीज संघाकडून कर्णधार शाय होप यानेच सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. वेस्ट इंडीजकडून काइल मायर्स 2, ब्रँडन किंग 17, एलिक एथनाज 22, शिमरोन हेटमायर 11, रोवमन पॉवेल 4, रोमारियो शेफर्ड 0, यानिक कारिया 3, डोमिनिक ड्रेक्स 3, तर जेडन सील्स आणि गुडाकेश मोटीला भोपळाही फोडता आला नाही.

भारतीय संघाचीही कसरत : वेस्ट इंडीज संघाने दिलेल्या 115 धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चांगलीच कसरत करावी लागली. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या शूभमन गिलला पुन्हा एकदा अपयश आले. त्याने केवळ 7 धावा काढून तंबुचा रस्ता धरला. तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार 25 चेंडूत 19 धावा काढत स्वस्तात माघारी परतला. हार्दिक पांड्या केवळ 5 धावा काढून दुर्दैवीरित्या धावबाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरलाही सूर गवसला नाही. शार्दुल ठाकूर केवळ एक धाव काढून बाद झाला. भारतीय संघाकडून इशान किशनने सर्वाधिक 52 धावा काढत अर्धशतक झळकावले. त्यानंतर मात्र कर्णधार रोहित शर्माने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली. रोहित शर्माने 12, तर रविंद्र जडेजाने 16 धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाच्या गोलंदाजांना आम्ही खेळू शकलो नाही : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजच्या संघावर विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दुर्दैवाने आमची फलंदाजी पाहिजे तशी झाली नाही. या खेळपट्टीवर धावा करणे कठीण होते. आम्हाला अशा खेळपट्टीवर धावा करण्याचे मार्ग शोधावे लागतील, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार शाय होप याने व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.