ETV Bharat / sports

अंतिम सामन्यात फलंदाजाला शतक झळकावणं असतं महाकठीण, आजपर्यंत केवळ 'या' सहा फलंदाजांनी केली कामगिरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 1:10 PM IST

World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची रंगत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर काही क्षणात सुरू होणार आहे. यापूर्वी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केवळ सहा फलंदाजांना शतक झळकावता आलं आहे. त्यामुळे आज कोणता फलंदाज शतक झळकावणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

World Cup 2023 Final
संपादित छायाचित्र

हैदराबाद World Cup 2023 Final : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोणता फलंदाज शतक झळकावून हा सामना संस्मरणीय बनवेल, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण 12 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये केवळ 6 फलंदाजांना शतक करण्यात यश आलं आहे. यातील 5 फलंदाजांनी आपल्या संघाला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत केवळ दोन कर्णधारांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे ही 6 शतकं वेगवेगळ्या विश्वचषकात झाली.

  • कोणी मारलं होतं 1975 च्या विश्वचषकात शतक : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात 1975 मध्ये करण्यात आली. या स्पर्धेच्या पहिल्याच विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 जून 1975 मध्ये क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर खेळवला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 8 गडी गमावून 291 धावा केल्या. त्यामध्ये कर्णधार क्लाइव्ह लॉईडनं 85 चेंडूत 102 धावांची शानदार खेळी केली. क्लाइव्ह लॉईडनं आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारत धुव्वाधार फलंदाजी केली होती. एकवेळ वेस्ट इंडिजच्या 3 विकेट 50 धावांवर पडल्या होत्या, पण नंतर क्लाइव्ह लॉईडनं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत डाव सावरला. त्यानं रोहन कन्हाईसह चौथ्या विकेटसाठी 149 धावा जोडल्या. 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 274 धावात गडगडला होता. वेस्ट इंडिजनं पहिला विश्वचषक जिंकला असून त्यात क्लाइव्ह लॉईडनं महत्वाची भूमिका बजावली होती.
  • विश्वचषक 1979 : दुसऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर 23 जून 1979 रोजी खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. सर व्हिव्ह रिचर्ड्सनं इंग्लिश संघाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत नाबाद 138 धावांची शानदार खेळी केली. रिचर्ड्सनं 157 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं शतक झळकावलं. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं 9 गडी गमावून 286 धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 194 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजनं 92 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं.
  • विश्वचषक 1996 : सहाव्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं निर्धारित 50 षटकात 241 धावा केल्या. श्रीलंकेकडून अरविंद डी सिल्वानं 124 चेंडूत नाबाद 107 धावांची खेळी केली. श्रीलंका या सामन्यात जिंकल्यानं प्रथमच विश्वविजेता बनवली. श्रीलंकेनं 245 धावा करुन ऑस्ट्रेलियाचा 7 विकेटनं पराभव केला.
  • विश्वचषक 2003 : भारत 2003 च्या विश्वचषकात 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होती. मात्र विश्वविजेता होण्याच्या प्रवासात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग आडवा आला. 23 मार्च 2003 रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सौरव गांगुलीनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही मोठी चूक ठरली. ऑस्ट्रेलियाच्या केवळ चार फलंदाजांनी 359 धावांचा डोंगर उभारला. यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगनं 121 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं नाबाद 140 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं भारताला केवळ 2 गडी गमावून 360 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 234 धावात बाद झाल्यानं ऑस्ट्रेलियानं 125 धावांनी सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं.
  • विश्वचषक 2007 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम सामना 2007 मध्ये प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला. 28 एप्रिल 2007 रोजी ब्रिजटाऊन इथं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी अॅडम गिलख्रिस्टनं 104 चेंडूत 149 धावांची जोरदार खेळी केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. यामध्ये गिलख्रिस्टनं 13 चौकार आणि 8 षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियन संघानं 38 षटकात 4 गडी गमावून 281 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 215 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार 53 धावांनी सलग तिसरा विश्वचषक जिंकला.
  • विश्वचषक 2011 : भारतात खेळल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील स्पर्धेत भारतीय संघ दुसऱ्यांदा जगज्जेता ठरला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार महेला जयवर्धनेच्या 88 चेंडूत 103 धावांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेच्या संघानं 50 षटकात 6 गडी गमावून 274 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 4 गडी गमावून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. महेला जयवर्धेचं शतक व्यर्थ गेलं.

हेही वाचा :

  1. भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामान्यात आयोजित 'हे' खास शो
  2. विश्वचषक विजेत्या संघात पराभूत झाले तरी खेळाडू होणार कोट्याधीश; जाणून घ्या बक्षिसाची रक्कम
  3. भारताच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधींसह विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा, वाच कोण काय म्हणाले?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.