ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 ENG vs SL : विजयी मार्गावर परतण्यासाठी भिडणार इंग्लंड-श्रीलंका; कशी असेल खेळपट्टी, वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 11:33 AM IST

Cricket World Cup 2023 ENG vs SL
Cricket World Cup 2023 ENG vs SL

Cricket World Cup 2023 ENG vs SL : आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील 25 व्या सामन्यात आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात कमकुवत संघ आहेत.

बंगळुरु Cricket World Cup 2023 ENG vs SL : आयसीसी विश्वचषकातील 25वा सामना आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुपारी 2 वाजता बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचं नेतृत्व जॉस बटलरकडं तर श्रीलंकेचं नेतृत्व कुसल मेंडिसकडे असेल. या सामन्यात विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही संघ आपला मागील सामना गमावल्यानंतर आज आमने-सामने उतरणार आहेत. या सामन्यात बाजी मारुन कोण विजयी मार्गावर परतणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. इंग्लंडने 3 सामने गमावले आहेत. तर केवळ 1 सामना जिंकलाय. श्रीलंकेनंही 4 सामन्यांत 1 जिंकलाय तर 3 सामने गमावलाय. या दोन्ही संघांचे 4 सामन्यांनंतर 2 गुण आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकून आणखी 2 गुण मिळवू शकेल हे सामना झाल्यावरच कळेल.

या खेळाडूंवर असतील नजरा : इंग्लंडकडून आतापर्यंत डेव्हिड मलान आणि जो रुट यांनी शतकं झळकावली आहेत. या दोघांशिवाय संघाचा अन्य कोणताही फलंदाज या स्पर्धेत आपली छाप पाडू शकलेला नाही. तर श्रीलंकेसाठी फक्त कुसल मेंडिसनं आतापर्यंत फलंदाजीनं चमत्कार घडवून आणलाय. त्याच्याशिवाय इतर खेळाडूंची कामगिरी खुपच निराशाजनक दिसत आहे. या सामन्यात इंग्लंडला जॉस बटलर, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि बेन स्टोक्स यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. त्याच वेळी श्रीलंकेला कुसल परेरा, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, महिश थिक्षना, दिलशान मदुशंका आणि चमिका करुणारत्न यांनी चांगली खेळी करावी अशी अपेक्षा असेल.

इंग्लंड-श्रीलंका हेड टू हेड : इंग्लंड आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 78 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडनं 38 तर श्रीलंकेनं 36 सामने जिंकले आहेत. या दोन संघांमधील 3 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही तर 1 सामना अनिर्णित राहिला. या दोन संघांमधील एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सामन्यांवर नजर टाकली तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 11 वेळा सामना झालाय. यात इंग्लंडनं 6 तर श्रीलंकेनं 5 सामने जिंकले आहेत. यामुळं या दोन्ही संघात 'काँटे की टक्कर' असल्याचं पहायला मिळतंय.

खेळपट्टी कशी असेल : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी चांगली मानली जाते. इथं फलंदाज सेट झाल्यानंतर खूप धावा काढू शकतात, तर वेगवान गोलंदाज नव्या चेंडूनं विकेट घेऊ शकतात. मधल्या षटकांमध्ये जुन्या चेंडूवर फिरकीपटूही प्रभावी ठरतात. एकूणच, क्रिकेटशौनिकांना इथं धावांचा पाऊस पडताना पहायला मिळू शकतो. या खेळपट्टीवर 350 धावा सहज करता येतात तर 300 धावांचा यशस्वी पाठलागही करता येतो.

काय असू शकते प्लेइंग इलेव्हन :

  • इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रुट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार/ यष्टिरक्षक), सॅम करन, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड, गस एटकिंसन
  • श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टिरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशन हेमंथा, चमिका करुणारत्न, महेश थीक्षाना, दिलशान मदुशंका, कसून रजिथा

हेही वाचा :

  1. Glenn Maxwell : दिल्लीत आलं 'मॅक्सवेल' नावाचं तुफान! विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकलं
  2. Cricket World Cup २०२३ : ऑस्ट्रेलियानं नोंदवला विश्वचषकातील सर्वात मोठा विजय, नेदरलॅंडचा ३०९ धावांनी पराभव
  3. Shubman Gill : शुभमन गिल लवकरच बनेल जगातील नंबर १ फलंदाज, ICC ची ताजी क्रमवारी जाहीर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.