ETV Bharat / sports

भारत-इंग्लंड दुसरी कसोटी : भारताने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार....

author img

By

Published : Feb 13, 2021, 9:10 AM IST

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाने आपले स्थान यापूर्वीच निश्चित केल्यामुळे समोरच्या बाकावर कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने भारताविरुद्धचा हा कसोटी सामना जिंकल्यास भारताची अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा जवळपास संपुष्टात येईल. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथण फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारत-इंग्लंड दुसरी कसोटी
भारत-इंग्लंड दुसरी कसोटी

चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना रंगतआहे. पहिल्या कसोटीतील मोठ्या पराभवानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या कसोटीत विजयाची अपेक्षा आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी विराटसेनेला इंग्लंडबरोबरील दोन सामने आणि सोबतच मालिका जिंकण्याचे आव्हान असेल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाने आपले स्थान यापूर्वीच निश्चित केल्यामुळे समोरच्या बाकावर कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने भारताविरुद्धचा हा कसोटी सामना जिंकल्यास भारताची अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा जवळपास संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरी गाठण्यासाठी लढत होईल.

विराटच्या नेतृत्वात भारताने गेल्या दोन महिन्यांत दोन कसोटी सामने गमावले आहेत. तर, कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला नमवले. रहाणेकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील पराभव या चर्चेला अधिक उत्तेजन देईल.

हेही वाचा - अजून एका क्रिकेटपटूची पितृत्वाची रजा मंजूर...

दरम्यान, इंग्लंडने दुसर्‍या सामन्यासाठी संघात चार बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या जागी स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावातील खराब कामगिरीमुळे डोम बेसला वगळण्यात आले आहे. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तर, जोस बटलरही संघाबाहेर पडला आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली आणि यष्टिरक्षक फलंदाज बेन फॉक्स, ख्रिस वोक्स आणि ओली पोपला संघात स्थान देण्यात आले आहे. या चौघांपैकी अंतिम अकरामध्ये ख्रिस वोक्सला बाहेर बसवण्यात आले आहे.

तर, भारतीय फळीत डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंच्या बदली अक्षर पटेल, कुलदीप यादव, आणि मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे अक्षरला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यामुळे अक्षरचा हा पदार्पणाचा कसोटी सामना आहे.

संघ -

इंग्लंड : डोम सिब्ले, रोरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि ओली स्टोन.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.