ETV Bharat / sports

रिषभ पंतच्या दमदार शतकामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारत सुस्थितीत

author img

By

Published : Mar 5, 2021, 12:05 PM IST

Updated : Mar 5, 2021, 5:18 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर सुंदर ८ चौकारांसह ६० तर, अक्षर पटेल ११ धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ३ तर, बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

भारत वि. इंग्लंड लेटेस्ट न्यूज
रिषभ पंत

अहमदाबाद - सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने भारताला दुसऱ्या दिवशी सांभाळले. दुसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडसमोर पहिल्या डावात ७ बाद २९४ धावा केल्या. भारताकडे आता ८९ धावांची आघाडी आहे. रिषभ पंतने आक्रमक खेळीचा नजराणा पेश करत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक साकारले. तर, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात कसोटी मालिकेचा शेवटचा आणि चौथा सामना सुरू आहे. मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे

कालच्या १ बाद २४ या धावसंख्येवरून आज भारताने पुढे खेळायला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा संघाला मोठी धावसंख्या उभारून देतील असे वाटत होते. मात्र, इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने पुजाराला १७ धावांवर पायचित पकडले. त्यानंतर आलेला विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले. त्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध पद्धतीने खेळायला सुरुवात केली. अजिंक्यचा जम बसलेला असताना वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला माघारी धाडले. अजिंक्यने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला स्टोक्सने पायचित पकडले. रोहिड ४९ धावांवर बाद झाला. त्यानंतर अश्विनही १२ धावांवर माघारी परतला.

पंत-सुंदरची जोडी जमली -

दीडशेच्या आत भारताचे सहा फलंदाज बाद झाले असताना रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी टिच्चून फलंदाजी केली. या दोघांनी मिळून शंभरपेक्षा जास्त धावा जमवल्या. काही सामन्यांपासून नव्वदीत अडकलेला पंत आज शतक करण्यात यशस्वी ठरला. पंतने ११८ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकार लगावत १०१ धावा केल्या. शतक केल्यानंतर त्याला अँडरसने बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसअखेर सुंदर ८ चौकारांसह ६० तर, अक्षर पटेल ११ धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ३ तर, बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक -

  • नाणेफेक - इंग्लंड (फलंदाजी)
  • इंग्लंड पहिला डाव - २०५/१० (बेन स्टोक्स ५५, अक्षर पटेल ४/६८)
  • भारत पहिला डाव - २९४/७* (रिषभ पंत १०१, जेम्स अँडरसन ३/४०)

हेही वाचा - VIDEO : धोनी आयपीएल २०२१ च्या तयारीला लागला, असे झाले जंगी स्वागत

Last Updated : Mar 5, 2021, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.