ETV Bharat / sports

WTC Final 2023 : दोन्ही संघ संतुलित, सामना रोमांचक होणार - दिलीप वेंगसरकर

author img

By

Published : Jun 6, 2023, 5:03 PM IST

Updated : Jun 6, 2023, 5:59 PM IST

Dilip Vengsarkar
दिलीप वेंगसरकर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ईटीव्ही भारतच्या संजीब गुहा यांच्यासोबत खास बातचीत केली. यावेळी वेंगसरकर यांनी टीम इंडियाची तयारी आणि संघासमोर असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकला.

कोलकाता : 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले की, जगभरातील कोणत्याही क्रिकेट संघासाठी इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच कठीण असते. येथे वेगवान गोलंदाजांना मिळणाऱ्या अतिरिक्त स्विंगमुळे फलंदाजांना त्यांना सामोरे जाणे अधिक कठीण होते.

भारताची फलंदाजी मजबूत : फायनल सामन्यासाठी भारतीय संघ गोलंदाजांच्या निवडीबाबत जरी गोंधळात असला तरी फलंदाजांमध्ये शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे या फलंदाजांची निवड जवळपास पक्की आहे. तसेच 7 जून रोजी ओव्हल येथे होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी हवामान देखील खेळाला अनुकूल असण्याची अपेक्षा आहे.

भारत दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता : टीम इंडियातील सूत्रांनी सूचित केले आहे की, भारत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. भारताने दोन फिरकीपटू खेळवल्यास रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांचे प्लेइंग 11 मधील स्थान पक्के आहे.

दोन्ही संघ संतुलित : भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना वाटते की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन आघाडीच्या संघांमधील हा अंतिम सामना रंजक असेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला ईटीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले की, 'दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. तसेच दोन्ही संघ संतुलित आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. मला आशा आहे की सामन्याच्या कोणत्याही दिवशी पाऊस व्यत्यय आणणार नाही.'

बुमराह आणि हेजलवूड सामन्याला मुकणार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे दोन्ही संघांतील आघाडीचे गोलंदाज या सामन्यासाठी अनुपलब्ध आहेत. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे गेल्या एका वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे तर ऑसीजसाठी जोश हेझलवूड देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र वेंगसरकर यांच्या मते बुमराहची अनुपस्थिती भारताला जास्त जाणवणार नाही कारण संघातील इतर गोलंदाज तेवढ्याच तोडीचे आहेत असे ते म्हणतात. दिलीप वेंगसरकर यांनी संतुलित संघ निवडल्याबद्दल निवडकर्त्यांचे कौतुक केले आहे.

'अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनाने फलंदाजी परफेक्ट' : भारतासाठी कोणता गोलंदाज गेम चेंजर ठरू शकतो, असे विचारले असता त्यांनी कोण्या एकाची निवड करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट या पाच गोलंदाजांपैकी कोणीही उत्तम गोलंदाजी करू शकतो. मात्र, अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनाने भारतीय फलंदाजीला चालना मिळाल्याचे वेंगसरकर यांना वाटते. ते म्हणाले की, अजिंक्य संघात परतल्यामुळे फलंदाजी एकदम परफेक्ट दिसते आहे.

संभाव्य प्लेइंग 11 : भारत - शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा/उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज ; ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड/मायकेल नेसर

हेही वाचा :

  1. WTC Final 2023 : ICC प्रोमोमध्ये WTC फायनल 2023 करता स्मिथ विरुद्ध कोहलीचे पोस्टर
  2. MS Dhoni Surgery : महेंद्रसिंह धोनीच्या पायावर पार पडली शस्त्रक्रिया
Last Updated :Jun 6, 2023, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.