Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Sep 30, 2023, 2:17 PM IST

Cricket World Cup

Cricket World Cup : ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. 'टीम इंडिया' हा विश्वचषक जिंकण्याची प्रबळ दावेदार मानली जात आहे. आतापर्यंत झालेल्या १२ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली? जाणून घ्या सोप्या भाषेत.

नवी दिल्ली Cricket World Cup : क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त ६ दिवस उरले आहेत. पुढील दीड महिना संपूर्ण देशात क्रिकेटचा ज्वर असेल. भारतानं शेवटचा वर्ल्डकप २०११ मध्ये जिंकला होता. विशेष म्हणजे तेव्हा भारतच वर्ल्डकपचा यजमान होता. यामुळे यंदा मायभूमीत होणाऱ्या विश्वचषकासाठी भारत पुन्हा एकदा विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

आतापर्यंत १२ विश्वचषक स्पर्धां झाल्या : १९७५ पासून आतापर्यंत एकूण १२ विश्वचषक स्पर्धांचं आयोजन झालं आहे. टीम इंडिया १९८३ आणि २०११ मध्ये दोनदा वर्ल्ड चॅम्पियन बनली असून, २००३ मध्ये भारताला फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आजच्या या बातमीत आम्ही तुम्हाला १९७५ ते २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल सांगणार आहोत.

 • १९७५ विश्वचषक - ५ वे स्थान : पहिला विश्वचषक क्रिकेटची पंढरी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. एस. वेंकटराघवन हे तेव्हा भारताचे कर्णधार होते. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास राहिली नाही. भारतानं ३ पैकी केवळ एका सामन्यात (पूर्व आफ्रिकेविरुद्ध) विजय मिळवला. या विश्वचषकात भारतीय संघ ५ व्या स्थानी राहिला. वेस्ट इंडिजनं हा वर्ल्डकप जिंकला होता.

संघ - श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (कर्णधार), सय्यद आबिद अली, मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी (उपकर्णधार), फारुख इंजिनियर (यष्टीरक्षक), अंशुमन गायकवाड, सुनील गावस्कर, करसन घावरी, मदन लाल, ब्रिजेश पटेल, एकनाथ सोलकर, गुंडप्पा विश्वनाथ, सय्यद किरमाणी (यष्टीरक्षक), पार्थसारथी शर्मा.

Cricket World Cup
१९७५ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • १९७९ विश्वचषक – ७ वे स्थान : १९७९ च्या क्रिकेट विश्वचषकाचं यजमानपद पुन्हा एकदा इंग्लंडकडं होतं. पहिल्या विश्वचषकातील खराब कामगिरीनंतरही टीम इंडियाची कमान एस. व्यंकटरघवन यांच्याकडं सुपूर्द करण्यात आली. या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी १९७५ पेक्षाही वाईट होती. भारतानं आपले तीनही सामने गमावले. या विश्वचषकात भारताचा श्रीलंकेसारख्या कमकुवत संघाकडून पराभूत झाला. तर वेस्ट इंडिज सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला.

संघ : श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी, अंशुमन गायकवाड, सुनील गावस्कर (उपकर्णधार), करसन घावरी, कपिल देव, सुरिंदर खत्रा (यष्टीरक्षक), ब्रिजेश पटेल, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, भरत रेड्डी, यजुर्विंद्र सिंह, यशपाल शर्मा.

Cricket World Cup
१९७९ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • १९८३ विश्वचषक - चॅम्पियन : १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ कमकुवत मानला जात होता. सराव सामन्यातही टीम इंडियाचा इंग्लिश काऊंटी संघाकडून पराभव झाला. मात्र मुख्य फेरीचे सामने सुरू होताच, भारतीय संघातील खेळाडू फॉर्मात आले. साखळी फेरीत वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करून भारतानं सर्वांनाच चकित केलं. यानंतर कपिल देव याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करत प्रथमच विश्वविजेतेपद पटकावलं.

संघ : कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सुनील गावस्कर, सय्यद किरमानी (यष्टीरक्षक), मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर संधू, यशपाल शर्मा, रवी शास्त्री, कृष्णमाचारी श्रीकांत, सुनील वॉल्सन, दिलीप वेंगसरकर

Cricket World Cup
१९८३ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • १९८७ विश्वचषक – उपांत्य फेरी : १९८७ चा विश्वचषक भारत आणि पाकिस्ताननं संयुक्तपणे आयोजित केला होता. त्यावर्षी पहिल्यांदाच विश्वचषक ६० षटकांऐवजी ऐवजी ५० षटकांचा खेळवण्यात आला. या स्पर्धेत कपिल देव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज चेतन शर्मानं विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक साधली. अंतिम फेरीत इंग्लंडला पराभूत करुन ऑस्ट्रेलिया प्रथमच विश्वविजेता ठरला.

संघ : कपिल देव (कर्णधार), कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर (उपकर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन, रॉजर बिन्नी, सुनील गावस्कर, मनिंदर सिंग, किरण मोरे (यष्टीरक्षक), चंद्रकांत पंडित, मनोज प्रभाकर, चेतन शर्मा, रवी शास्त्री, नवज्योत सिंग सिद्धू, लक्ष्मण शिवरामकृष्णन.

 • १९९२ विश्वचषक - ७ वे स्थान : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी संयुक्तपणे १९९२ च्या विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या विश्वचषकात संमिश्र कामगिरी केली. टीम इंडियाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या विश्वचषकात पहिल्यांदाच खेळला. या विश्वचषकात भारत सातव्या स्थानी राहिला. फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करुन इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान विश्वविजेता ठरला.

संघ : मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार), सुब्रोतो बॅनर्जी, सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, विनोद कांबळी, कपिल देव, रवी शास्त्री (उपकर्णधार), संजय मांजरेकर, किरण मोरे (यष्टीरक्षक), मनोज प्रभाकर, व्यंकटपथी राजू, कृष्णामाचारी श्रीकांत, जवागल श्रीनाथ, प्रवीण आमरे

Cricket World Cup
१९९२ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • १९९६ विश्वचषक – उपांत्य फेरी : १९९६ च्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडं होतं. त्यावर्षी मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात होती. केनिया आणि वेस्ट इंडिजचा पराभव करत भारतानं चांगली सुरुवातही केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. मात्र उपांत्य फेरीत भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्कारावा लागला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेनं प्रथमच विश्वचषकावर नाव कोरलं.

संघ : मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार), सचिन तेंडुलकर (उपकर्णधार), विनोद कांबळी, आशीष कपूर, अनिल कुंबळे, संजय मांजरेकर, नयन मोंगिया (यष्टीरक्षक), मनोज प्रभाकर, व्यंकटेश प्रसाद, नवज्योत सिंग सिद्धू, जवागल श्रीनाथ, अजय जडेजा, सलील अंकोला, व्यंकटपथी राजू.

Cricket World Cup
१९९६ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • १९९९ विश्वचषक - ६ वे स्थान : १९९९ च्या विश्वचषकाचं यजमानपद इंग्लंडकडं होतं. या विश्वचषकात भारतीय संघाची कमान मोहम्मद अझरुद्दीनकडं होती. भारतानं साखळी सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला, मात्र उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला.

संघ : मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार), सौरव गांगुली, अजय जडेजा (उपकर्णधार), सदगोप्पन रमेश, राहुल द्रविड, रॉबिन सिंग, अजित आगरकर, अनिल कुंबळे, नयन मोंगिया (यष्टीरक्षक), सचिन तेंडुलकर, व्यंकटेश प्रसाद, निखिल चोप्रा, देबासिस मोहंती, जवागल श्रीनाथ, अमय खुरासिया

Cricket World Cup
१९९९ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • २००३ विश्वचषक - अंतिम फेरी : २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाची कमान सौरव गांगुलीच्या हाती होती. या विश्वचषकाचं यजमानपद प्रथमच दक्षिण आफ्रिकेकडं होतं. संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघानं शानदार खेळ केला आणि ऑस्ट्रेलिया वगळता सर्व संघांना पराभूत केलं. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं १२५ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव करत भारताचं दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंग केलं.

संघ : सौरव गांगुली (कर्णधार), राहुल द्रविड (उपकर्णधार/विकेटकीपर), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, अनिल कुंबळे, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), दिनेश मोंगिया, संजय बांगर, आशिष नेहरा, अजित आगरकर

Cricket World Cup
२००३ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • २००७ विश्वचषक – ९ वे स्थान : वेस्ट इंडिजनं आयोजित केलेला हा विश्वचषक भारतासाठी अतिशय वाईट राहिला. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंनी सजलेला भारतीय संघ बांग्लादेशसारख्या दुबळ्या संघाकडून पराभूत होऊन ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. या विश्वचषकात टीम इंडिया ९ व्या स्थानावर राहिली. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर राहुल द्रविडनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडलं. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ सलग तिसऱ्यांदा आणि एकूण चौथ्या वेळा विश्वविजेता ठरला.

संघ : राहुल द्रविड (कर्णधार), सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रॉबिन उथप्पा, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग (उपकर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), इरफान पठाण, अजित आगरकर, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, झहीर खान, एस श्रीशांत, मुनाफ पटेल

Cricket World Cup
२००७ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • २०११ विश्वचषक - चॅम्पियन : २०११ विश्वचषकाचं आयोजन भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे केलं होतं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनली. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तर उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक होता. या विजयासह त्याचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. स्टार क्रिकेटर युवराज सिंगनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), वीरेंद्र सेहवाग (उपकर्णधार), गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना, विराट कोहली, युसूफ पठाण, झहीर खान, हरभजन सिंग, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, एस. श्रीशांत, पियुष चावला, आर अश्विन

Cricket World Cup
२०११ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • २०१५ विश्वचषक – उपांत्य फेरी : ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विश्वचषकात भारतीय संघानं चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभव झाल्यानं भारताचं तिसऱ्यांदा जगज्जेते होण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. या विश्वचषकात भारताकडून विराट कोहली, शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं शानदार खेळ केला. अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून कांगारू संघ विक्रमी पाचव्यांदा विश्वविजेता ठरला.

संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), विराट कोहली (उपकर्णधार), रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू (विकेटकीपर), मोहम्मद शमी, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव.

Cricket World Cup
२०१९ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ
 • २०१९ विश्वचषक – उपांत्य फेरी : २०१९ विश्वचषकाचं यजमानपद इंग्लंडकडं होतं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या विश्वचषकातही पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र पावसानं प्रभावित झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. या सामन्यातील धोनीचा तो रन आऊट आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. हा सामना धोनीचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरला. त्यानंतर २०२० मध्ये त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानं या स्पर्धेत विक्रमी ५ शतकं झळकावली होती. क्रिकेटची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडनं अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून प्रथमच विश्वविजेतेपद पटकावलं.

संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केएल राहुल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, विजय शंकर, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी.

Cricket World Cup
२०१५ क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघ

हेही वाचा :

 1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.