ETV Bharat / sports

KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम

author img

By

Published : Oct 24, 2020, 3:18 PM IST

Updated : Oct 24, 2020, 7:35 PM IST

वरूण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्सच्या वेगवान माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले आणि कोलकाताने दिल्लीवर ५९ धावांनी विजय मिळवला.

KKR vs DC Live Cricket Score, IPL 2020 Today Match: Delhi Capitals Opt to Field First Against Kolkata Knight Riders
KKR vs DC : चक्रवर्ती-कमिंन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचा ५९ धावांनी विजय

अबुधाबी - वरूण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्सच्या वेगवान माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले आणि कोलकाताने दिल्लीवर ५९ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १३५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. चक्रवर्ती ५ तर कमिन्सने ३ गडी बाद करत दिल्लीची फलंदाजी कापून टाकली. या विजयासह केकेआरने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखल्यामुळे आता यापुढील संघांमध्ये रंगणारे सामने अधिक रंगतदार होणार आहेत.

कोलकाताच्या मजबूत १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला पायचित केले. या धक्क्यातून सावरण्याआधीच कमिन्सनेच दुसरा धक्का दिला. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात इन फार्म शिखर धवनला (६) क्लिन बोल्ड केले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात पंत (२७) झेलबाद झाला. त्याचा झेल शुबमन गिलने टिपला.

वरूण चक्रवर्तीने १४व्या षठकात लागोपाठ दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूवर त्याने हेटमायरला (१०) त्रिपाठी करवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने पुढील चेंडूवर सेट फलंदाज अय्यरला नागरकोटीकडे झेल देण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे अय्यरला चक्रवर्तीच्या त्याच षटकातील पहिल्या चेंडूवर जीवदान मिळाले होते. त्याचा फायदा अय्यरला उचलता आला नाही. अय्यरने ३८ चेंडूत ४७ धावा केल्या.

अय्यर पाठोपाठ मार्कस स्टॉयनिसही माघारी परतला. त्याची विकेट चक्रवर्तीने घेतली. तर झेल त्रिपाठीने टिपला. स्टायनिस (६) बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विजयाच्या आशा संपूष्टात आल्या आणि दिल्लीला २० षटकात ९ बाद १३५ धावांपर्यतच मजल मारता आली. कोलकाताने हा सामना ५९ धावांनी जिंकला. कोलकाताकडून चक्रवर्तीने ४ षटकात २० धावा देत ५ गडी बाद केले. तर पॅट कमिन्सने ४ षटकात १७ धावा देत ३ गड्यांना तंबूत धाडले. लॉकी फर्ग्युसनने एक गडी बाद केला.

नितीश राणा (८१) आणि सुनिल नरेन (६४) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत चौथ्या गड्यासाठी ५६ चेंडूत केलेल्या ११५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ६ बाद १९४ धावा केल्या होत्या. केकेआरची अवस्था एकवेळ ४२ वर तीन गडी बाद अशी केविलवाणी होती. तेव्हा राणा-नरेन जोडीने केकेआरचा डाव सावरत दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोन्ही फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावत केकेआरला सन्मानजनक आश्वासक उभारुन दिली.

दिल्लीने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. संघाची धावसंख्या ११ असताना शुबमन गिल (९) बाद झाला. त्याची विकेट नार्खियाने घेतली. शुबमनचा झेल अक्षर पटेलने घेतला. यानंतर राणा-राहुल त्रिपाठी ही जोडी डाव सावरणार असे वाटत असताना, नॉर्कियाने आणखी एक धक्का दिला. त्याने राहुलला (१३) त्रिफाळाचीत केले. दिनेश कार्तिक अवघ्या तीन धावांवर माघारी परतला. त्याला रबाडाने पंतकरवी झेलबाद केले.

कोलकाताची अवस्था ७.२ षटकात ४२ धावांवर ३ बाद अशी झाली. तेव्हा राणा आणि वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळालेल्या सुनिल नरेनने संघाचा डाव सावरला. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. नरेनने अश्विनने टाकलेल्या ९व्या षटकात १३ धावा वसूल केल्या. यानंतर तुषार देशपांडेने टाकलेल्या १०व्या षटकात नरेन-राणा जोडीने १८ धावा झोडपल्या. यात दोन चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. स्टॉइनिसने टाकलेल्या ११व्या षटकात दोघांनी ११ धावा वसूल केल्या. यानंतर १२व्या षटकात दोघांनी अश्विनला पुन्हा झोडपले. त्यांनी २ चौकार आणि १ षटकारासह १७ धावा वसूल करत संघाला शंभरी गाठून दिली. हाच धडाका दोघांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. दोघांनी ५६ चेंडूत ११५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, राणा- नरेन यांनी आपली वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केली.

नरेनची खेळी रबाडाने संपुष्टात आणली. उंच टोलवण्याच्या नादात उडलेला झेल सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने टिपला. नरेनने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांसह ६४ धावा झोडपल्या. राणाने ५३ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. तर इयॉन मॉर्गनने १७ धावा केल्या. दिल्लीकडून एनरिक नॉर्किया, रबाडा स्टॉयनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ -

शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -

अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबाडा, तुषार देशपांडे आणि एनरिच नॉर्किया.

Last Updated : Oct 24, 2020, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.