ETV Bharat / sports

DC vs MI : मुंबईचा नाद नाय करायचा.. दिल्लीवर ९ गडी राखून विजय

author img

By

Published : Oct 31, 2020, 3:01 PM IST

Updated : Oct 31, 2020, 6:40 PM IST

सलामीवीर इशान किशनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने दिलेले १११ धावांचे आव्हान मुंबईने १४.२ षटकात सहज पूर्ण केले.

IPL 2020 Live Score, DC vs MI Live Cricket Score :
Live DC vs MI : मुंबईचा नाद नाय करायचा.. दिल्लीवर ९ गडी राखून विजय

दुबई - सलामीवीर इशान किशनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने दिलेले १११ धावांचे माफक आव्हान मुंबईने १४.२ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. इशान किशनला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी भक्कम साथ दिली. मुंबईच्या विजयामुळे दिल्लीची प्ले ऑफची वाट आणखी खडतर झाली आहे.

दिल्लीच्या १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी ६८ धावांची सलामी दिली. ही जोडीच मुंबईला विजय मिळवून देणार असे वाटत असताना, डी-कॉक (२६) बाद झाला. यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. किसनने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ४७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी साकारली.

त्याआधी, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्यासह मुंबईच्या, भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. दिल्लीचा संघ २० षटकात ९ बाद ११० धावांच करू शकला. बुमराह आणि बोल्टने प्रत्येकी ३ गडी बाद करत दिल्लीचे कंबरडे मोडले.

मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आयपीएलमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच षटकात त्याला माघारी पाठवले. सूर्यकुमार यादवने त्याचा सुरेख झेल टिपला. तिसऱ्या षटकात बोल्टने पृथ्वी शॉला (१०) माघारी धाडत दिल्लीची अवस्था २ बाद अशी केविलवाणी केली.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ११व्या षटकात क्विंटन डीकॉकने चपळ स्टम्पिंग करून दिल्लीला मोठा धक्का दिला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. मार्कस स्टायनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शिमरोन हेटमायर स्वस्तात बाद झाले. यानंतर अश्विनने १२ धावा करत संघाला शतकासमित नेले. त्याला बोल्टने कृणाल पांड्याकरवी बाद केले. अखेर दिल्लीला ११० धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून बुमराह आणि बोल्टने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर कुल्टर नाइल आणि राहुल चहर यांनी १-१ गडी टिपला.

Last Updated : Oct 31, 2020, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.