ETV Bharat / sports

DC VS MI : मुंबईचं बलाढ्य आव्हान पेलत प्ले ऑफ फेरी गाठण्याचे दिल्लीचं लक्ष्य

author img

By

Published : Oct 31, 2020, 12:22 PM IST

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज ५१वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मुंबईने या सामन्याआधीच प्ले ऑफचे तिकीट पक्के केले आहे. पण दिल्लीला प्ले ऑफ गाठण्यासाठी विजयाची गरज आहे.

ipl 2020 dc vs mi match preview
DC VS MI : प्ले ऑफ फेरी गाठण्याचे दिल्लीचं लक्ष्य, समोर आहे मुंबईचे बलाढ्य आव्हान

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज ५१वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. डबल हेडरमधील हा सामना असून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. मुंबईने या सामन्याआधीच प्ले ऑफचे तिकीट पक्के केले आहे. पण दिल्लीला प्ले ऑफ गाठण्यासाठी विजयाची गरज आहे. तुल्यबळ संघात सामना होत असल्याने, हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सला सहा गडी राखून पराभूत केल्यामुळे मुंबईचे प्ले ऑफ फेरीतील स्थान पक्के झाले. परंतु १४ गुण खात्यावर असलेल्या दिल्लीला उर्वरित दोन सामन्यांमध्ये एक विजय मिळवून प्ले ऑफ फेरीसाठी दावेदारी करता येईल. पंजाब, कोलकाता आणि हैदराबाद यांच्याकडून सलग तीन सामन्यांमधील पराभवांमुळे त्यांना बाद फेरीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुंबई इंडियन्सचा समतोल संघ -

रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर असून देखील मुंबईच्या इतर खेळाडूंनी त्याची कमतरता भासू दिलेली नाही. क्विंटन डी कॉक आणि इशान किशन संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरत आहेत. यानंतर सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी हे मधल्या फळीत फटकेबाजी करत आहेत. त्यांना हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांची साथ आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन हे त्रिकूट भेदक मारा करत आहेत. त्यांना राहुल चहरची साथ आहे.

दिल्लीचे खेळाडू कामगिरीतील सातत्य राखण्यात अपयशी -

दिल्लीसाठी पहिले काही सामने वगळता सलामी जोडीची कामगिरी चिंतेचा विषय आहे. शिखर धवन सातत्याने धावा करत आहे. पण दुसरा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ, मागील काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. यामुळे दिल्लीने अजिंक्य रहाणेला संधी दिली. पण त्याला देखील आपली छाप सोडता आली नाही. श्रेयश अय्यर, शिमरोन हेटमायर चांगली कामगिरी नोंदवत आहेत. ऋषभ पंतला धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळाला. मार्कस स्टोयनिसने अष्टपैलू कामगिरी केली आहे. कागिसो रबाडा आणि एनरिक नार्जिया हे मागील सामना वगळता टिच्चून मारात करत आहेत. त्यांना अनुभवी आर. अश्विनच्या फिरकीची साथ आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ -

रोहित शर्मा (दुखापतग्रस्त), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स पॅटिंन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड (कर्णधार), कृणाल पांड्या, मिचेल मॅकलेनगन, मोहसिन खान, नाथन कुल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -

श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिच्छाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमेयर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, प्रवीण दुबे, एनरिच नार्जिया, डॅनियल सैम्स.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.