ETV Bharat / sitara

मराठी भाषेतील 'बाहुबली' चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा' वाहिनीवर प्रक्षेपित होणार

author img

By

Published : Oct 20, 2021, 8:34 PM IST

भव्य दिव्य ‘बाहुबली’च्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी दिवाळी भेट आणली आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या ‘बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल दिवाळी भेट ठरणार आहे.

मराठी भाषेतील 'बाहुबली'
मराठी भाषेतील 'बाहुबली'

मराठी प्रेक्षकांच्या मनात जसं सैराटचं स्थान आहे तसेच बाहुबलीचे सुद्धा आहे. भलेही तो चित्रपट दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी बनविला होता परंतु हिंदीमध्ये डब करून वितरित केल्यावर संपूर्ण भारतात, महाराष्ट्रासकट, त्याने तिकीट बारीवर धुमाकूळ घातला. अभिनेता प्रभास ने साकारलेल्या बाहुबली ने इतिहास रचला होता. निष्णात दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचे दिग्दर्शन, उच्च निर्मितीमूल्ये, आधुनिक तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा योग्य वापर, विराट सेटस् आणि त्याला मिळालेली उत्कृष्ट अभिनयाची साथ यामुळे बाहुबली प्रचंड प्रमाणात यशवी चित्रपट ठरला. त्याचा दुसरा भाग जो बाहुबलीची आधीची कथा सांगत होता तोदेखील बॉक्स ऑफिसवर धमाल करून गेला.

याच भव्य दिव्य ‘बाहुबली’च्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी दिवाळी भेट आणली आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या ‘बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल दिवाळी भेट ठरणार आहे. आपला मराठीबाणा दाखवत ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचा खास मराठमोळा साज आणि त्याच्या तोडीस तोड मराठी चित्रपट आणताना कोणतीही कसर सोडलेली नाही. यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.

अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.

मराठी ‘बाहुबली’चे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या संकल्पनेचे स्वागत करताना भव्यतेसोबत मराठी भाषेचा लहेजा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीने पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत याचा महत्त्वपूर्ण भाग होता आल्याचं समाधान अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे व्यक्त केले. गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा गंध असणार आहे हे नक्कीच प्रत्येक मराठीजनाला सुखावणारं आहे, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं.

बाहुबलीच्या मराठी आवृत्तीबद्दल बोलताना ‘शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा म्हणाले की, “भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे बाहुबली हा सिनेमा. या सिनेमाने फक्त कमाईचे नाही तर लोकप्रियतेचेही उच्चांक गाठले. जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी रसिकांसाठी मराठी रूपात, मराठी आवाजात आपल्या मराठी भाषेच्या लहेजात आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे”.

शेमारू मराठीबाणा वाहिनीचा हा दिमाखदार व दमदार मराठमोळा ‘बाहुबली’ दिवाळीच्या निमित्ताने गुरुवार ४ नोव्हेंबरला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर प्रक्षेपित होणार आहे.

हेही वाचा - ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये कॅटरीना कैफ, गोविंदा आणि रोहित शेट्टी यांनी लावली हजेरी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.