ETV Bharat / sitara

वृद्ध बाळूमामाचं दर्शन घडणार विजयादशमीपासून!

author img

By

Published : Oct 14, 2021, 10:55 PM IST

बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता.तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. बालूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून आता वृध्द बाळूमामांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजत आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र या जयघोषाने दुमदुमला.

बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता.तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. अनेक कुटुंबांचा मामा आधार झाले होते. कधी योग्य सल्ला देऊन,कधी चुकीच्या वाटेवर जाणार्‍याला योग्य वाटेवर आणून, कधी सहाय्य करून, कधी चमत्कार करून लोकांच्या कल्याणाचे कार्य ते करत राहिले. त्यांचे एकूण कार्य पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, उपाशी पोटी अध्यात्म त्यांनी कोणालाच करायला सांगितले नाही. अन्न, वस्त्र, निवारा नसेल तर आधी तो प्रश्न मार्गी लावण्याकडे त्यांचा भर होता. मनुष्याला काही व्याधी असतील तर त्या आधी बर्‍या करण्यावर त्यांनी प्राथमिकता दिली आणि नंतर लोकांना भजन, कीर्तन, पंढरीची वारीची सोपी साधना दिली.

बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झाले असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात, अंधश्रद्धा, भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. समाज जरी एका मोठ्या बदलातून जात असला तरी त्यांनी त्यांचे ठरवलेले कार्य अहोरात्र चालू ठेवले. त्यांच्यासमोर येणाऱ्या माणसांचे त्यांनी जगण्याचे प्रश्न पहिले सोडवले आणि मग त्यांना अध्यात्माची गोडी लावली. आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

यानिमित्ताने बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, “बाळूमामांचे निसर्गाशी जवळचं नातं होतं. भक्तांसाठी कार्य करत असताना निसर्गात असलेले सगळे जीव किती महत्वाचे आहेत हे त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगातून पटवून दिले. मुक्या जीवांचे प्रेमाने संगोपन ते स्वतः करत होते आणि त्याचबरोबर सर्व जीवांच्या ठाई एकच आत्मा आहे हे आचरणातून सिद्ध करत होते. मामांनी पाच राज्यांमध्ये भ्रमण करत असंख्य कुटुंबांना भक्तीच्या एका सूत्रात बांधलं आणि अनेक पिढ्यांचा उद्धार केला. मेंढरांसोबत रानोमाळ फिरताना, आस्तिकतेचे, भक्तीचे बीज सगळीकडे ते पेरत राहिले आणि आज त्याचे असंख्य वटवृक्ष झाले आहेत. लोकांच्या मनामध्ये बाळूमामांची जी प्रतीमा आहे ती उत्तरार्धातली आहे. लोकांचं त्या प्रतिमेशी भावनिक नातं आहे. बाळूमामांचं चरित्र सांगत असताना ही प्रतिमा प्रेक्षकांसमोर घेऊन येणं हे एक आव्हान आहे. कारण ती प्रतिमा त्यांच्या उतरर्धातल्या व्यापक कार्याचे प्रतिक आहे.”

ते पुढे म्हणाले की, “बाल, तरुण बाळू मामा प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर वृद्ध बाळू मामाचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. भक्तांच्या मनात वृद्ध बाळूमामांची प्रतिमा कोरलेली आहे. मामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे. संत परंपरेत अहोरात्र कार्य करणाऱ्या मामाचं कार्य ह्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे.”

येत्या विजयादशमीपासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून वृद्ध बाळूमामाचं दर्शन 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून कलर्स मराठीवर.घडणार आहे.

हेही वाचा - 'टायगर 3'चे शूटिंग संपताच सलमान सुरू करणार नव्या प्रोजेक्टला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.