ETV Bharat / sitara

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू घेऊन येतेय ‘आठवा रंग प्रेमाचा’!

author img

By

Published : Mar 17, 2021, 1:19 PM IST

‘सैराट’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली रिंकु राजगुरु पुन्हा एकदा मराठी पडद्यावर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता रिंकू राजगुरू ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

-aathwa-rang-premacha
‘आठवा रंग प्रेमाचा’

मुंबई - ‘सैराट’ चित्रपटातील प्रेमकथा खूपच गाजली होती. त्या चित्रपटाचा पगडा आजही काही चित्रपटांच्या कथानकावर दिसतो. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरलेल्या या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीतला एक गुणी अभिनेत्री मिळाली ती म्हणजे रिंकू राजगुरू जिला ‘सैराट’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने (खास नोंद) सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर ‘कागर’ आणि ‘मेकअप’ हे मराठी चित्रपट तिने केले. तसेच हिंदीत तिने ‘हंड्रेड’ नावाची वेब सिरीज केली ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता रिंकू राजगुरू एका नवीन ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रेम ही संकल्पनाच चिरंतन राहणारी असल्यानं आतापर्यंत प्रेमावरचे अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. "आठवा रंग प्रेमाचा" हा चित्रपट सात रंगांपलीकडील आठवा प्रेमाचा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आधुनिक काळातली आणि फ्रेश-मॉडर्न कथा प्रेक्षकांना पाहता येईल. आपल्या सौंदर्यानं आणि अदांनी प्रेक्षकांना मोहवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दर्शविणार आहे. खुशबू सिन्हा यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत.

'Aathwa Rang Premacha'
‘आठवा रंग प्रेमाचा’ पोस्टर
समीर कर्णिक यांनी "क्यू हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला पगला दिवाना", "चार दिन की चांदनी", "हिरोज", "नन्हे जैसलमेर" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधला मोठा अनुभव गाठीशी घेऊन समीर कर्णिक आता निर्माता म्हणून मराठीत पहिलं पाऊल टाकत आहेत.आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शननं "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरित करणार आहे. रिंकू राजगुरू सोबत ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे ‘हाकमारी’ करत निर्मितीक्षेत्रात पदार्पण!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.