ETV Bharat / sitara

अमृता खानविलकर, वंदना गुप्ते आणि पुष्कर जोग यांची लंडन मध्ये ‘वडा पाव’ पार्टी!

author img

By

Published : Apr 3, 2021, 8:05 PM IST

'Vada Pav' party in London!
लंडन मध्ये ‘वडा पाव’ पार्टी!

'वेल डन बेबी' या चित्रपटाचे शुटिंग लंडनमध्ये पार पडले. प्रचंड थंडीत हे शूट सुरू होते. अशावेळी कलाकारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न निर्माता करीत असतो. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता पुष्कर जोग आहे. त्याने आपल्या कलाकारांना लंडनमध्ये मेजवानी दिली आणि या मेजवानीचा मेन्यू होता, 'वडा पाव'. यामुळे अमृता खानवीलकर आपल्या निर्मात्यावर फिदा झाली.

मुंबई आणि वडा पाव यांचे अतूट नाते आहे. किमतीबद्दल सोडा पण वडा पाव पोट तर भरतोच परंतु अत्यंत स्वादिष्टही असतो. बऱ्याच चित्रपट आणि मालिकांच्या सेटवर ब्रेकमध्ये बऱ्याचदा नाश्ता म्हणून त्याचाच उपयोग होताना दिसतो. मुंबई बाहेरही वडा पावचे लोण पसरले आहे आणि भारतातील अनेक प्रांतात तो ‘सापडतो’. परंतु तुम्हाला परदेशात वडा पाव खावासा वाटलं तर? ‘वेल डन बेबी’ या चित्रपटाचे शूट मुख्यत्वे लंडनमध्ये झाले असून एके दिवशी अभिनेत्री अमृता खानविलकरला तिथे चमचमीत वडा पाव खाण्याचे ‘डोहाळे’ लागले. म्हणजे तिच्याकडून ‘गुड न्यूज’ वगैरे नाहीये पण तिला लंडनच्या थंडीत गरमागरम वडा पाव खावासा वाटत होता.

लंडन मध्ये ‘वडा पाव’ पार्टी!
त्याचं झालं असं की आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत गप्पा मारताना अमृता आणि पुष्करने त्यांच्या लंडनमधील ‘वडा पाव’ पार्टीबद्दल सांगितले. ‘पुष्कर निर्माता म्हणून कसा आहे? कंजूष की दिलदार?’ या प्रश्नावर उत्तर देताना अमृता म्हणाली, ‘पुष्कर प्रचंड दिलदार निर्माता आहे. तो खूप लाड करतो. म्हणजे सेटवर किंवा इतर वेळीही त्याने आमचे खूप लाड केलेत. आम्ही लंडनमध्ये शूट करीत असताना रोज ब्रेड खाऊन कंटाळा आला होता आणि मला आणि वंदूताईला (जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते) काहीतरी चमचमीत खावेसे वाटत होते. आम्हा दोघींनाही मुंबईच्या चटकदार वडा पाव ची आठवण येऊ लागली होती. मी पुष्करला सांगितले की काहीही कर आणि आमच्यासाठी वडा पाव आणून दे. खरंतर मला माहित होतं की तिथे वडा पाव मिळणार नाही पण तरीही ‘मन की भडास निकलनेको’ त्याला आम्ही सांगितले. तेव्हा तो काही बोलला नाही. परंतु पॅक-अप झाल्यावर त्याने आम्हाला रूमवर न जाता गाडीत बसायला सांगितले. कशाबद्दल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही निघालो आणि गाडी एका भारतीय रेस्टॉरंटसमोर थांबली. आम्ही प्रश्नार्थक नजरेने पुष्करकडे पाहत होतो. परंतु त्याने काहीही न बोलता आम्हाला आत नेले. तेथेही आम्ही काय खाणार वैगैरे न विचारता तो इतर विषयांवर गप्पा मारू लागला. तेव्हड्यात एक ओळखीचा वास आला. हो, तो चक्क बटाटा वड्याचा होता. प्लेट मध्ये वडा पाव होता आणि तो बघून मी किंचाळायचीच बाकी होते.’
लंडन मध्ये ‘वडा पाव’ पार्टी!
‘नंतरचा बराचसा वेळ शांततेत गेला कारण आम्ही वडा पाव वर तुटून पडलो होतो. हे कमी की काय तर नंतर चाट ची प्लेट आली. तो वडा पाव आणि शेव पुरी मला थेट मुंबईत घेऊन गेली. मन तृप्त होईपर्यंत आम्ही सर्व फस्त केलं. स्वर्गीय सुख की काय म्हणतात ते हेच असावं याची अनुभूती घेतली. नंतर समजलं की आम्ही वडा पाव ची डिमांड केल्यानंतर पुष्करने फोनाफोनी करून ही सर्व व्यवस्था केली होती. खरंच, वेळीच हवी असलेली गोष्ट मिळाली की जो आनंद होतो तो मी आणि वंदूताईंनी अनुभवला. पुष्कर खरंच खूप गोड व्यक्ती आहे’ असं अमृता पुढे म्हणाली. अमृता खानविलकर ‘वेल डन बेबी’ चित्रपटात प्रेग्नन्ट तरुण पत्नीची भूमिका निभावत आहे. त्याचा दाखला देत हसत हसत अमृता पुढे म्हणाली की, ‘गर्भवती महिलेची भूमिका ऑन स्क्रीन करताना माझ्या वास्तविक जीवनातील आकांक्षा देखील वाढल्या आणि त्या पुष्करने काहीही कारण न देता पुऱ्याही केल्या. जर का खऱ्या आयुष्यात मी प्रेग्नन्ट असेन व माझ्या नवऱ्याने माझे ‘डोहाळे’ पुरविले नाहीत तर मी नक्कीच त्याला पुष्करचा हा किस्सा ऐकवेन आणि खडसावेन’. अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग अभिनित ‘वेल डन बेबी’ ९ एप्रिल रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रीमिअरसाठी सज्ज आहे.हेही वाचा - विकी कौशलने केले सॅम माणेकशॉ यांचे जयंती निमित्य स्मरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.