ETV Bharat / sitara

ईशान-अनन्याचा ‘खाली पिली’ ठरणार लॉकडाऊननंतर थिएटर्समध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा

author img

By

Published : Oct 9, 2020, 5:54 PM IST

‘खाली पिली’ हा सिनेमा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी झीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या ‘झी सिनेप्लेक्स’वर रिलीज करण्यात आला होता. मात्र आता १५ ऑक्टोबरपासून देशभरातील थिएटर्स सुरू होणार असल्याने १६ ऑक्टोबर रोजी उपलब्ध थिएटर्समध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा ठरणार आहे.

Ishaan-Ananya's 'Khali Pili'
ईशान-अनन्याचा ‘खाली पिली

मुंबई - ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा ‘खाली पिली’ हा सिनेमा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी झीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या ‘झी सिनेप्लेक्स’वर रिलीज करण्यात आला होता. मात्र आता १५ ऑक्टोबरपासून देशभरातील थिएटर्स सुरू होणार असल्याने १६ ऑक्टोबर रोजी उपलब्ध थिएटर्समध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा ठरणार आहे.

‘झी स्टुडिओज’नी स्वतःच यासाठी पुढाकार घेतला असून काही मल्टीप्लेक्सनी यासाठी होकार दिला आहे. तर बाकीचे मल्टीप्लेक्स चेन्सदेखील त्याला होकार देण्याची शक्यता आहे. खरं तर देशभरात थिएटर्स बंद असल्याने ‘झी स्टुडिओज’ने हा सिनेमा ‘झी सिनेप्लेक्स’सारख्या अभिनव कल्पनेद्वारे रिलीज केला होता. यात प्रेक्षकांना या सिनेमाचं तिकीट डिजिटल पेमेंट करून खरेदी करायचं होतं. त्यानंतर दिवसात चार शोमध्ये कोणताही एक शो पाहण्याची संधी त्यांना मिळणार होती. मात्र आधीच ओटीटी प्लॅटफॉर्मचं पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या प्रेक्षकांनी पुन्हा सिनेमासाठी तिकीट काढायला अखडता हात घेतल्याने ही कल्पना म्हणावी तेवढी काही यशस्वी ठरली नाही.

त्यानंतर केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून १५ ऑक्टोबरपासून थिएटर्स ५० टक्के प्रेक्षकसंख्येने सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर ‘झी स्टुडिओज’ने हिच संधी साधून आपला सिनेमा १६ ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेही सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही मोठा सिनेमा सध्या थिएटर्समध्ये रिलीजसाठी तयार नाही. त्यात थिएटर्स सुरू झाली तरीही कोरोनाच्या भीतीमुळे किती लोकं थिएटर्समध्ये येऊन सिनेमा पाहतील याची साशंकता थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स मालकांना आहे. अशात ‘खाली पिली’च्या निमित्ताने हा सिनेमा पुन्हा रिलीज करून जर ही लिटमस टेस्ट पूर्ण होत असेल तर त्यासाठी थिएटर्स मालक या सिनेमाच्या रिलीजला होकार देण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अखेर कोणता सिनेमा रिलीज करायचा याची कोंडी फुटत असल्याने सात महिन्यांचा लॉकडाऊन पूर्ण केल्यानंतर थिएटर्समध्ये रिलीज होणारा ‘खाली पिली’ हा पहिला सिनेमा ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.