ETV Bharat / international

Maldives Presidential Election : चीन समर्थक की भारत समर्थक, मालदीवचे लोक कोणाला राष्ट्रपती म्हणून निवडतील?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 10:17 AM IST

Maldives Presidential Election : मालदीवमध्ये ३० सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांकडे भारत आणि चीन या दोन्ही देशांचं लक्ष आहे. येथे भारत समर्थक उमेदवार इब्राहिम सोलिह आणि चीन समर्थक उमेदवार मोहम्मद मुइज्जू यांच्यात थेट लढत असेल. वाचा ईटीव्ही भारतचे अरुणिम भुईया यांचा खास रिपोर्ट...

Maldives Presidential Election
Maldives Presidential Election

नवी दिल्ली Maldives Presidential Election : मालदीवमध्ये ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम सोलिह आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद मुइज्जू यांच्यात निकराची लढत पाहायला मिळतेय. ९ सप्टेंबर रोजी मतदानाच्या पहिल्या फेरीत आठ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ५० टक्के मतं मिळाली नाहीत. पहिल्या फेरीत मुइज्जू यांना ४६.०६ टक्के तर सोलिह यांना ३९.०५ टक्के मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराला ५० टक्के मतं न मिळाल्यास रनऑफ घेतला जातो.

चीन समर्थक आणि भारत समर्थक उमेदवारांमध्ये लढत : मोहम्मद मुइज्जू हे मालदीवची राजधानी मालेचे महापौर असून ते पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे (PPM) संयुक्त उमेदवार आहेत. ते कट्टर चीन समर्थक मानले जातात. त्यामुळे ते राष्ट्रपती म्हणून निवडून येणं भारतासाठी चिंताजनक असेल. दुसरीकडे, भारत समर्थक इब्राहिम सोलिह हे सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे नेते आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांचा पराभव केल्यानंतर ते निवडणूक लढवण्यास पात्र ठरले होते. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत चीन समर्थक मुइज्जू यांनी घेतलेल्या आघाडीमुळे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय लढतीकडे भारताचं विशेष लक्ष असेल.

मालदीव भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण : हिंद महासागरातील आपल्या स्थानामुळे मालदीव भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर भारत आणि मालदीव यांच्यात प्राचीन काळापासून सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. तथापि, २००८ पासून मालदीवमधील अस्थिरतेमुळे या संबंधात अनेक उतार-चढाव आले. चीन समर्थक यामीन २०१३ ते २०१८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष असताना भारत आणि मालदीवमधील संबंध खूपच बिघडले होते. या दरम्यान चीनची या प्रदेशातील सामारिक उपस्थिती वाढली होती. मात्र २०१८ मध्ये भारत समर्थक सोलिह सत्तेवर आल्यानंतर भारत-मालदीव संबंधांमध्ये सुधारणा झाली.

निवडणुकीपूर्वी 'इंडिया आऊट' मोहिम : या निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्रपती यामीन यांच्या PPM आणि PNC या पक्षांनी 'इंडिया आऊट' मोहिम उघडली होती. भारताची मालदीवमधील गुंतवणूक, दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी आणि भारताच्या सुरक्षा तरतुदींबद्दल द्वेष पसरवणे हा 'इंडिया आउट'चा उद्देश. मात्र या मोहिमेला मर्यादित पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष सोलिह यांनी एक आदेश जारी करून 'इंडिया आउट' मोहिम 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली.

PPM चा राष्ट्रवादी भावना जागृत करण्याचा प्रयत्न : या प्रकरणी मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिसमधील रिसर्च फेलो स्मृती पटनायक यांनी ईटीव्ही भारतला अधिक माहिती दिली. 'PPM हा पक्ष अधिक पुराणमतवादी आणि चीन समर्थक आहे. पीपीएमनं 'इंडिया आउट' मोहीम राबवून देशात राष्ट्रवादी भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. यामीन हे नेहमीच चीन-भारत कार्ड खेळतात', असं त्यांनी सांगितलं.

माजी राष्ट्रपती नशीद किंगमेकर बनले : मालदीवमधील सध्याच्या घडामोडींबद्दल बोलायचं झालं तर माजी राष्ट्रपती नशीद हे किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी सुरवातील डेमोक्रॅट्स सोलिह यांना पाठिंबा देणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी, MDP नं नशीद यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मागे घेतला.

राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सार्वमत : नशीद देशाची अध्यक्षीय राजकीय व्यवस्था संसदीय प्रणालीमध्ये बदलण्यासाठी सार्वमत घेण्यास आग्रही आहेत. पटनायक यांच्या म्हणण्यानुसार, नशीद सोलिह यांच्याशी देशाच्या राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सार्वमत घेण्यासाठी करार करत आहेत. त्या म्हणाल्या की, 'यामीन यांनीही नशीद यांना पुन्हा निवडून आल्यानंतर पुढचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सार्वमत घेण्याचे आश्वासन दिलं आहे.

निवडणुकीचा प्रभाव नवी दिल्लीत पडेल : चीन समर्थक अध्यक्ष की भारत समर्थक अध्यक्ष? मालदीवमधील मतदार ३० सप्टेंबरला यावर अंतिम निर्णय घेतील. मालदीवमधील अनेक विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी येतात. तेथून अनेक लोकही उपचारासाठी भारतात येत असतात. त्यामुळे या निवडणुकीचा प्रभाव नवी दिल्लीतील राजकारणावर पडेल यात शंका नाही.

हेही वाचा :

  1. India Canada Relations : भारत-कॅनडा वाद; 'या' देशानं दिला भारताला पाठिंबा, कॅनडाला फटकारलं
  2. China On Arunachal Players : चीनची सारवासारव, अरुणाचलच्या खेळाडू प्रकरणानंतर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचं आवाहन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.