ETV Bharat / international

Temple Vandalize In Canada : कॅनडात हिंदू मंदिरांची तोडफोड थांबेना; खलिस्तान समर्थकांनी आणखी एका मंदिरावर केला हल्ला

author img

By

Published : Aug 13, 2023, 3:12 PM IST

खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील हिंदू मंदिरांवर पुन्हा एकदा हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्याच्या संदर्भात हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे.

Khalistan supporters
खलिस्तान समर्थक

ओटावा : कॅनडात खलिस्तान समर्थकांचा हिंसाचार थांबत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी शनिवारी रात्री पुन्हा एकदा कॅनडातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशिरा खलिस्तान समर्थक खलिस्तानी सार्वमताचे पोस्टर घेऊन हिंदू मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तेथे तोडफोड केली. वृत्तानुसार ही घटना कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात घडली आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : ऑस्ट्रेलिया टुडेने ट्विटरवर म्हटले आहे की, खलिस्तानी अतिरेक्यांनी कॅनडातील आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली. त्यांनी भारतीय समुदायामध्ये भीती निर्माण करण्यासाठी मंदिराच्या द्वारावर खलिस्तान सार्वमताचे पोस्टर्स चिकटवले. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की, १८ जूनच्या हत्येमध्ये कॅनडा भारताच्या भूमिकेची चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुखवटा घातलेले पुरुष पोस्टर चिकटवताना आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी फोटो काढताना दिसत आहेत. मंदिराच्या गेटवरील पोस्टरमध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचा फोटो दिसतो आहे. या वर्षी जूनमध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली होती.

यापूर्वीही हल्ले झाले आहेत : कॅनडात हिंदू मंदिरावर झालेला हा काही पहिलाच हल्ला नाही. अशा अनेक घटना यापूर्वी खलिस्तानी अतिरेक्यांनी घडवून आणल्या आहेत. यावर्षीही अशा काही घटना समोर आल्या आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये कॅनडाच्या ओंटारियोमधील विंडसर येथील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करत भारतविरोधी पोस्टर चिटकवण्यात आले होते. तर फेब्रुवारीमध्ये कॅनडातील मिसिसॉगा येथील राम मंदिराची तोडफोड करण्यात आली होती.

भारतीय वाणिज्य दूतावासाने निषेध केला : टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंदिरावरील हल्याचा निषेध केला आहे. त्यांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून दोषींवर त्वरीत कारवाई करण्याची विनंती केली. जानेवारीमध्ये ब्रॅम्प्टनमधील एका हिंदू मंदिरात भारतविरोधी पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे भारतीय समाजात नाराजी पसरली होती. टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंदिरातील तोडफोडीचा निषेध केला असून या कृत्यामुळे कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा :

  1. Temple Vandalize In Australia : ऑस्ट्रेलियात पुन्हा मंदिराची तोडफोड, खलिस्तान समर्थकांनी केला हल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.