ETV Bharat / international

दिशाहीन तालिबान सैरभैर! सरकार चालविण्यासाठी माजी अधिकाऱ्यांसमोर तालिबानचे आर्जव!

author img

By

Published : Aug 19, 2021, 7:15 PM IST

Updated : Aug 19, 2021, 7:43 PM IST

दिशाहीन तालिबान सैरभैर! सरकार चालविण्यासाठी माजी अधिकाऱ्यांसमोर तालिबानचे आर्जव!
दिशाहीन तालिबान सैरभैर! सरकार चालविण्यासाठी माजी अधिकाऱ्यांसमोर तालिबानचे आर्जव!

एका देशाच्या सरकारचा पाडाव करून पूर्णपणे सत्ता मिळविलेला तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. देश चालविण्यासाठी कुठलेच धोरण किंवा योजना समोर नसल्याने माजी सरकारी अधिकाऱ्यांसमोर आर्जव करण्याची वेळ तालिबानवर ओढवल्याचे दिसत आहे. मात्र तालिबानच्या भितीने अनेक सरकारी अधिकारी भूमिगत झाले असून ते आता देशातून पलायनाच्या तयारीत असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.

काबूल : एका देशाच्या सरकारचा पाडाव करून पूर्णपणे सत्ता मिळविलेला तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. देश चालविण्यासाठी कुठलेच धोरण किंवा योजना समोर नसल्याने माजी सरकारी अधिकाऱ्यांसमोर आर्जव करण्याची वेळ तालिबानवर ओढवल्याचे दिसत आहे. मात्र तालिबानच्या भितीने अनेक सरकारी अधिकारी भूमिगत झाले असून ते आता देशातून पलायनाच्या तयारीत असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.

तालिबानचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भेटीला

अल-रेहमान हक्कानींच्या नेतृत्वातील तालिबानच्या एका शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सलोखा उच्चायुक्तालयाचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि काबुलच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तालिबान काम करेल असे आश्वासन त्यांना दिले. अब्दुल्ला यांनी स्वतःच्या ट्विटर खात्यावरून याची माहिती दिली. या बैठकीदरम्यान अब्दुल्लांनी स्वतःचे अधिकृत पद अधोरेखित करताना न्यायावर आधारीत स्वतंत्र आणि एकसंघ अफगाणिस्तानला समर्थन असल्याचे म्हटल्याचेही सांगितले. सामाजिक न्यायाच्या अभावामुळे देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय ऐक्य शक्य नसल्याचे इतिहासातून दिसून आल्याचे शिष्टमंडळाला त्यांनी सांगितले. यावेळी हक्कानी यांनी काबुलच्या जनतेला सुरक्षितता पुरविण्याचे आश्वासन देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदत आणि समर्थनाची मागणी केल्याचे अब्दुल्लांनी म्हटले आहे.

सरकार चालविण्यासाठी पैसे व कर्मचारी नसल्याची तालिबानची कबुली

अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळविलेल्या तालिबानने गुरूवारी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत अमेरिकेवर विजय मिळविल्याची घोषणा केली. याचवेळी देश चालविण्यासाठी पैशांची तसेच सरकारी अधिकाऱ्यांची वानवा ही मोठी आव्हाने समोर असल्याचेही तालिबानने म्हटले आहे.

देश चालविण्यासाठी तालिबानकडे योजनाच नाही

देशाचे नेतृत्व कशा पद्धतीने केले जाईल याविषयी तालिबानने अजून काहीही स्पष्ट केलेले नाही. शरिया कायद्याचे पालन केले जाईल याव्यतिरिक्त तालिबानने देश चालविण्याविषयी काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. सध्या तालिबानी अफगाण सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. मात्र अतिशय अनिश्चिततेचा त्यांना सामना करावा लागत आहे.

सरकारी अधिकारी भूमिगत

तालिबानने सरकारी अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र अनेक अधिकारी भूमिगत झाले असून ते तालिबानपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्थानिक पत्रकारांनी म्हटले आहे. या परिस्थितीत अफगाणिस्तानच्या 9 अब्ज डॉलर्सच्या परदेशी ठेवींविषयीही अनिश्चितता निर्माण झाली आहे. या ठेवी अमेरिकेत आहेत.

मानवी संकट अधिक गडद

या सर्व परिस्थिती मानवी संकट अधिक गडद होण्याची भीती अफगाणिस्तानातील जागतिक अन्न उपक्रमाच्या प्रमुख मेरी एलेन मॅकग्रोर्टी यांनी व्यक्त केली आहे. अन्न आयातीच्या अडचणींशिवाय देशाच्या 40 टक्के भागात दुष्काळाने पिके नष्ट झाली आहे. अनेक नागरिक हे उद्यानांसारख्या खुल्या मैदानात वास्तव्यास आहेत. सध्या अफगाणिस्तानला मदतीची सर्वाधिक गरज आहे. आंतररराष्ट्रीय समुदायाने आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना भक्कम सहकार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

तालिबानच्या गोळीबारात 5 ठार

अफगाणिस्तानच्या कुनार प्रांताची राजधानी असादाबादमध्ये तालिबानी बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात गुरूवारी दोघांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानचा 102 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रध्वजासह रॅली काढणाऱया नागरिकांना लक्ष्य करत तालिबानी बंडखोरांनी गोळीबार केला होता. याच्या एकच दिवस आधी जलालाबादमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता.

जलालाबादमध्ये हिंसाचारात 3 ठार

अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जलालाबादमध्ये झालेल्या एका आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी तालिबानचा ध्वज काढून तिथे अफगाणिस्तानचा ध्वज फडकावला होता. यावेळी हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला. हिंसाचारानंतर तालिबानी प्रशासनाने खोस्ट प्रांतात 24 तासांच्या कर्फ्यूची घोषणा केली. दरम्यान, 19 ऑगस्ट 1919 मध्ये अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या अधिपत्यातून मुक्त झाला होता.

स्वातंत्र्यदिनी मनात कैद्याची भावना

19 ऑगस्ट हा अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. मात्र आता सरकारचा पाडाव झाला आहे. आता स्वातंत्र्याबद्दल काय बोलावे. लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. लोकांच्या मनात भीती आहे. स्वातंत्र्य दिनाला आमच्या मनात एखाद्या कैद्यासारखी भावना आहे असे मत माजी पत्रकार अख्तरबीर अख्तर यांनी व्यक्त केले आहे.

घनी यांनी व्हिडिओतून केले पलायनाचे समर्थन

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देशातून पलायन केल्यानंतर प्रथमच एक व्हिडिओ जारी करत स्वतःच्या पलायनाचे समर्थन केले आहे. रक्तपाताला प्रतिबंध करण्याचा हाच एकमेव मार्ग होता असे म्हणत त्यांनी पलायनाचे समर्थन केले आहे. देशाच्या तिजोरीतील कोट्यवधी डॉलर्स चोरल्याच्या अफगाणिस्तानच्या एका राजदूताचा दावाही त्यांनी खोडून काढला आहे. घनी यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरून व्हिडिओ जारी करत ते संयुक्त अरब अमिरातीत असल्याचे सांगितले आहे. यातून त्यांनी अफगाण सुरक्षा दलाचेही आभार मानले आहेत.

अमेरिकेने शस्त्रपुरवठा थांबविला

बायडेन प्रशासनाने अफगाण सरकारला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील नोटीस संरक्षण कंत्राटदारांना देण्यात आली आहे.

व्यापक राजकीय चर्चेवर रशियाचा भर

अफगाणिस्तानातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरूवारी अफगाणिस्तानातील सर्व राजकीय शक्तींमध्ये व्यापक चर्चेची गरज अधोरेखित केली. तसेच तालिबानने अजून संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविले नसल्याचेही रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. पंजशीर खोऱ्यात अफगाण फौजा एकत्रित येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नाणेनिधीकडून कर्ज मिळणार नाही

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अफगाणिस्तानातील विद्यमान तालिबान सरकारला कसलेही कर्ज दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नाणेनिधीकडून कर्जपुरवठा किंवा आर्थिक सहकार्याच्या यादीत अफगाणिस्तानातील नवे तालिबान सरकार नसल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे.

शेवटच्या अमेरिकन नागरिकाला बाहेर काढेपर्यंत सैन्य अफगाणिस्तानात असेल-बायडेन

अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती पाहता इथल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईपर्यंत अमेरिकन सैन्य तिथे ठेवले जाईल असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. शेवटच्या अमेरिकन नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढले जात नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात राहिल. यासाठी 31 ऑगस्टच्या सैन्य माघारीच्या डेडलाईनचे बंधन नसेल हेही बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर 15 हजार अमेरिकन नागरिक अजूनही अफगाणिस्तानात आहेत.

युरोपियन संघाचे 106 कर्मचारी सुरक्षितपणे परतले

युरोपियन संघाने 106 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे युरोपियन संघाच्या वतीने गुरूवारी सांगण्यात आले. युरोपियन संघाचे अजून 300 कर्मचारी अफगाणिस्तानात अडकून असल्याची माहिती युरोपियन संघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सांगितले.

स्पेनचे 53 नागरिक एअरलिफ्ट

स्पेनने आपल्या 53 नागरिकांना काबूलहून एअरलिफ्ट करत माद्रीदमध्ये आणले आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्पेनकडून प्रयत्न केले जात आहेत. तर अफगाणिस्तानातून सुटका झालेल्या 84 नागरिकांना घेऊन आलेले विमान कोपनहेगनला पोहोचल्याचे डेन्मार्कने स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी 100 सैनिकांचा समावेश असलेली तुकडी पाठविण्यास पोलंडच्या राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.

अफगाणिस्तानात शांततेसाठी पाकिस्तानची महत्वाची भूमिका-पाक गृहमंत्री

पाकिस्तानने अफगाण तालिबानला अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार केले आहे. त्यामुळे कोणताही देश पाकिस्तानकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशीद अहमद यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील शांततेसाठी पाकिस्तानची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तालिबान आणि अमेरिकेला चर्चेच्या टेबलवर आणण्यात पाकिस्तानने महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पेशावरमध्ये 31 अफगाण निर्वासितांना अटक

पेशावरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा देणाऱ्या 31 अफगाण निर्वासितांना बुधवारी रात्री अटक करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. बाब-ए-पेशावर येथील मुख्य रस्ता अडवून हे सर्व जण आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी पाकविरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा - Viral Video : अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पुन्हा गर्दी

Last Updated :Aug 19, 2021, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.