ETV Bharat / international

अफगाण भूमीचा वापर करून भारत पाकमध्ये दहशतवाद पसरवत नाही - अमेरिका

author img

By

Published : May 2, 2019, 10:02 AM IST

'भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा संवाद पूर्ववत होण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन कृतीत आणणे आवश्यक आहे. हे करण्याची पाकने हमी द्यावी,' असे म्हणत वेल्स यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे.

भारत पाकमध्ये दहशतवाद पसरवत नाही - अमेरिका

इस्लामाबाद - अफगाणिस्तानचा वापर करून भारत पाकिस्तानात दहशतवाद पसरवत असल्याचा पाकिस्तानचा आरोप अमेरिकेने फेटाळून लावला आहे. ‘या आरोपांबाबत आमच्याकडे पुरावे नाहीत’ असे अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. मात्र, कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देणार नाही, ही आमची भूमिका आहे, असे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाई देशांच्या मुख्य उप सहायक सचिव अ‍ॅलिस वेल्स यांनी सांगितले.


'आम्ही पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करतो. आम्ही कोणत्याही फुटीरतावादी आणि दहशतवादी चळवळीला पाठिंबा देणार नाही,' असे अ‍ॅलिस वेल्स यांनी म्हटले आहे. मात्र, 'भारत आणि अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानातील पश्तून तहाफूझ मूव्हमेंट (पीटीएम)ला निधी पुरवत असल्याचा पुरावा नाही,' असे म्हणत त्यांनी पाकिस्तान लष्कराने केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.


भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानात दहशतवाद पसरवत असल्याबाबत पाकिस्तानकडून नेहमीच कांगावा केला जातो. आता पाकिस्तान त्यांच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण यादव यांना 'पुरावा' दाखवण्याची खटपट करत आहे. जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून ३ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती, असा दावा पाकिस्तानने केला आहे. तर जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर व्यापारासाठी इराणमध्ये गेल्याचे सांगत तेथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याची भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. पाकिस्तानकडून अफगाणमधील हक्कानी गटाला आणि इतर दहशतवादी संघटनांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप भारत आणि अफगाणिस्तानने वारंवार केला आहे.


'भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा संवाद पूर्ववत होण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन कृतीत आणणे आवश्यक आहे. दहशतवादी गटांना पाकिस्तानी भूमीचा उपयोग करण्यापासून मज्जाव करण्याची आवश्यकता आहे. हे करण्याची पाकने हमी द्यावी,' असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.