ETV Bharat / entertainment

खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!

author img

By

Published : Jun 11, 2023, 9:59 PM IST

मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म खूप कमी आहेत. मात्र आता एक नवीन मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आला आहे. १ ओटीटी. या प्लॅटफॉर्मवर इतर भाषातील सिरीज सुरू आहेत. आता त्यावर मराठी सिरीज पाहायला मिळतील.

Etv Bharat 1 ओटीटी
Etv Bharat 1 ओटीटी

मुंबई - सध्या 'ओटीटी’ प्लॅटफॉर्म फॉर्मात आहेत आणि त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अनेक नवीन 'ओटीटी’ प्लॅटफॉर्म उदयास येत आहेत. परंतु मराठीसाठी या माध्यमांवर म्हणावी तशी जागा दिसून येत नाही. त्यामुळे काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन एका नवीन 'ओटीटी’ प्लॅटफॉर्म ची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी ‘1 ओटीटी’ चा सह-संस्थापक आणि ब्रँड फेस आहे. तसेच विनायक सातपुते, जे बी टी एल ॲक्टीव्हेशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. यांच्यासोबत वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, बँकर सतीश उतेकर आणि उद्योजक चेतन मणियार हे संस्थापक सदस्य आहेत.


भारताचा मोबाईल टीव्ही - गणपती बाप्पा आणि कलासक्त मराठी माणूस यांचे विशेष नाते आहे. कुठल्याही नवीन योजना अथवा कामाची सुरुवात ६४ कला अवगत असलेल्या गणरायाचे पूजन करून केली जाते. त्यामुळेच स्वप्नील जोशी आणि इतर सर्व संस्थापक सदस्यांनी ‘1 ओटीटी’ च्या शुभारंभानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. ‘1 ओटीटी' हा बहुभाषिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून त्याच्या मराठी विभागाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्याला ‘भारताचा मोबाईल टीव्ही’ असे संस्थापकांकडून संबोधिले जात आहे. या प्लॅटफॉर्मवर गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा इतर प्रादेशिक भाषांमधले मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत.


या व्यासपीठावर शुभारंभाची नांदी करण्यात आली ती समोर पाटील दिग्दर्शित ‘ब्लाइंड डेट’ ही वेब सिरीज रिलीज करून. मनस्विनी लता रवींद्र आणि अपूर्व साठे लिखित दहा भागांची ही वेब मालिका मल्टीस्टारर असून त्यात विशाखा सुभेदार, सौरभ घाडगे, हेमांगी कवी, अभिजित खांडकेकर, रुपाली भोसले, स्पृहा जोशी, हेमंत ढोमे, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, भाग्यश्री लिमये, सायली संजीव, गश्मीर महाजनी यांच्या भूमिका आहेत. भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी ‘कीर्तन नाद’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणला जाणार आहे. तसेच ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातील हिट मराठी चित्रपट दाखविले जाणार असून सुभाष घई यांच्या 'व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपटसुद्धा या प्लॅटफॉर्मचा भाग असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.