ETV Bharat / city

गळ्यावर चाकू ठेवून केली सव्वादहा लाखाची लूट... स्वीगी बॉयचा प्रताप

author img

By

Published : Mar 13, 2022, 4:19 PM IST

एका स्वीगी बॉयने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड, असा एकूण १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केला आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Naupada Police
नौपाडा पोलीस

ठाणे - तुम्ही घरी एकटे आहात... भूक लागली आहे.. काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय.. तर सावधान.. कारण ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका स्वीगी बॉयने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड, असा एकूण १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केला आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Holi 2022 : धुळवडसाठी नैसर्गिक रंगांच्या निर्मितीतून आदिवासी महिलांना रोजगार

ऑनलाईनचा जमाना आहे. सुईपासून ते मशीनपर्यंत आणि किराणापासून ते खाद्य पदार्थांपर्यंत सर्व वस्तू घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने मागवता येतात. त्यामुळे, आजकाल बहुतेक जण विविध हॉटेलमधून खाद्य पदार्थसुद्धा ऑनलाईन ऑर्डर करतात. ठाण्यातील नौपाडा येथील पाचपाखाडी परिसरात स्वीगी बॉयने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत चोरी केली आहे.

स्वीगी बॉयने सोन्या चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने, तसेच काही रोख रक्कम, असा एकूण १० लाख २० हजारांचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केला. नौपाडा परिसर हा ठाणे रेल्वे स्थानक जवळ असलेला परिसर आहे. अशा शहरी भागात हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीदायक वातावरण पसरले आहे.

घटना घडल्यानंतर या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तक्रार नोंदवून घेतली. तसेच, या प्रकरणी सूत्रांचा आणि तांत्रिक यंत्रणांचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी घरी एकट्या असलेल्या महिला आणि वृद्धांनी ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर सतर्कता बाळगली पाहिजे. शक्यतो अनोळखी व्यक्तींना घरात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - Thane Hijab Support Women Rallies : ठाण्यात 'महिला दिन हिजाब दिन व्हावा' या मागणीसाठी महिलांची रॅली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.