ETV Bharat / city

ZyCov-D : भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना वॅक्सिन, वाचा वैशिष्ट्य

author img

By

Published : Aug 23, 2021, 3:10 PM IST

Updated : Aug 23, 2021, 3:41 PM IST

भारतात तयार झालेलं हे एकमेव DNA Plasmid कोरोना वॅक्सिन आहे. हे वॅक्सिन घेतल्यानंतर शरीरात कोरोनाचे काही प्रमाणात स्पाईक प्रोटीन तयार होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात, प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते.

corona vaccine
संग्रहित फोटो

पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जग युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. याकरिता बाजारात वेगवेगळ्या वॅक्सिंन देखील उपलब्ध आहे. परंतु, हे वॅक्सिन अपुरे पडत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना वॅक्सिन तयार करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. भारतात आता आणखी एका कोरोना वॅक्सिनला परवानगी मिळाली आहे. ही वॅक्सिन म्हणजे ZyCov-D. हे वॅक्सिन म्हणजे भारताने तयार केलेली जगातील पहिली DNA Plasmid कोरोना वॅक्सिन आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील झायडस कॅडीला या कंपनीने हे वॅक्सिन तयार केले आहे. या वॅक्सिनविषयी अधिक माहिती दिली इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी...

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे
  • जगातील पहिले डीएनए बेस वॅक्सिन

भारतात तयार झालेलं हे एकमेव DNA Plasmid कोरोना वॅक्सिन आहे. हे वॅक्सिन घेतल्यानंतर शरीरात कोरोनाचे काही प्रमाणात स्पाईक प्रोटीन तयार होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात, प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर अंग दुखणे, ताप येणे यासारखा त्रास होईल. पण इंजेक्शन घेताना दुखणार नाही, वेदना होणार नाही हे त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा - चमत्कार! कोरोना लस घेतल्यानंतर आजीची दृष्टी आली परत!

  • तीन डोस घेणे गरजेचे

या वॅक्सिनचे 28 दिवसांच्या अंतराने तीन डोस घ्यावे लागतात. हे इंजेक्शन सुईने टोचले जाणार नाही. तर हे स्नायुच्या माध्यमातून दिले जाते. फार्माटेक नामक कंपनीने यासाठी एक उपकरण तयार केलं असून त्याद्वारे त्वचेमध्ये ते दिले जाते. त्यामुळे हे इंजेक्शन देताना दुखणार नाही. या वॅक्सिनचे तीन डोस घेतल्यानंतर शरीरात 66.6% अँटीबॉडीज तयार होतात. इतर वॅक्सिनच्या मानाने हे प्रमाण कमी असले तरी लवकरच दोन डोसमध्ये यापेक्षा जास्त अँटीबॉडीज तयार होतील अशी क्षमता विकसीत करण्याच्या पद्धतीची चाचणी सुरू असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

  • किशोरवयीन मुलांसाठीही उपयुक्त

बाजारात आतापर्यंत लहान मुलांसाठी कोरोनावरील वॅक्सिन उपलब्ध नाही. इतर वॅक्सिनची अजूनही लहान मुलांवर चाचणी झाली नाही. परंतु हे वॅक्सिन मात्र 12 वर्षावरील व्यक्तींना देता येईल. त्यामुळे 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी हे वॅक्सिन उपयुक्त ठरणार आहे.

  • वर्षाला 12 कोटी डोस विकसित करण्याची क्षमता

झायडस कॅडीला या कंपनीने दरमहिन्याला 1 कोटी याप्रमाणे वर्षाला 12 कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे वॅक्सिन बाजारात आले तर महिन्याला 33 लाख लोकांना हे वॅक्सिन देता येईल. हे वॅक्सिन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

या डीएनए बेस वॅक्सिनचा फायदा असा की, कोरोना विषाणूत काही बदल झाला, व्हेरिएंट निर्माण झाले तर त्यालाही हे लागू पडेल, असा विश्वास हे वॅक्सिन निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांना आहे. विषाणूने रूप बदलल्यानंतर वॅक्सिनमध्ये जो बदल करावा तो या वॅक्सिनमध्ये सहज करता येईल. त्यामुळे हे वॅक्सिन एकप्रकारे वरदान ठरू शकते.

हेही वाचा - देशाला मिळाली दुसरी स्वदेशी कोरोना लस; झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन मंजुरी

Last Updated : Aug 23, 2021, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.