ETV Bharat / city

पुण्यातील मानाच्या, प्रमुख गणपती मंडळांचा मोठा निर्णय; यंदा...

author img

By

Published : Aug 18, 2020, 5:19 PM IST

पुण्यातील मानाच्या, प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणेशाचे विधीवत पूजन करतील.

pune
मानाची गणेश मूर्ती

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना गणेश मंडळाच्याच अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यंदा कोरोनाचे सावट पाहता उत्सव साधेपणाने साजरा करीत असतानाच मानाची व प्रमुख गणपती मंडळे गणेश मंडळांच्याच पदाधिका-यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणेशाचे विधीवत पूजन करतील.

श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते होणार आहे. श्री गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल.

श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या वंशजातील केसरी वाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते तर केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिका-यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या १२८ वर्षात प्रथमच असे घडणार असून याद्वारे मंडळातील आपापसातील स्नेहभाव आणखी वृद्धींगत होणार आहे. तसेच गणेश मंडळांनी सत्यविनायक पूजा देखील करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.