ETV Bharat / city

पूजा चव्हाण प्रकरणीही असाच तपास केला असता तर.., चित्रा वाघ यांचा निशाणा

author img

By

Published : Sep 8, 2021, 7:20 PM IST

आजवर अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्यातील महिलांना अजूनही न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या घटनेतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास आरोपींवर जरब बसेल. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजेत, असे मत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

पुणे - पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील माहिती घेण्यासाठी भाजपा नेत्या चित्रा वाघ आज पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. परंतू पूजा चव्हाण प्रकरणातही पोलिसांनी असा तपास केला असता तर, असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

'जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास जरब बसेल'

चित्रा वाघ म्हणाल्या, की सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत त्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजवर अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्यातील महिलांना अजूनही न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या घटनेतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास आरोपींवर जरब बसेल. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

'बीडमध्ये गुंडाराज'

बीड पोलिसांनी करुणा शर्मा यांना अटक केली त्याविषयी विचारले असता चित्रा वाघ म्हणाल्या, की बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे. करुणा शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे ती अटक कोणत्या आधारे करण्यात आली याची माहिती पोलिसांनी देणे गरजेचे आहे. करुणा शर्मा यांच्याबाबतीत सत्तेचा गैरवापर करण्यात आला. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत आहे. गरज भासल्यास बीडमध्ये जाऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असा इशारादेखील चित्रा वाघ यांनी यावेळी दिला आहे.

'अजित पवार यांनी लक्ष घालावे'

पुण्यातील कदमवाकवस्ती या ठिकाणी सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली, त्याबाबत वेगवेगळे खुलासे सध्या केले जात आहेत. परंतु जर एखादा पुरुष महिलेला मारहाण करत असेल तर महिला गप्प बसणार नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर कदमवाकवस्ती येथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे आणि कुठलेही राजकारण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंतीदेखील चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.