ETV Bharat / city

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती निश्चित ! कमळाला इंजिनची साथ मिळाल्यास काय होणार परिणाम ?

author img

By

Published : Jul 17, 2021, 9:47 PM IST

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीचा नारळ फोडण्याचे काम सुरू आहे. भाजप व मनसेची युती झाल्यास नाशिक महापालिकेत काय परिणाम होणार व एकंदरीत राज्याच्या राजकारणावर याचे काय दूरगामी परिणाम होणार याचे सविस्तर विवेचन..

nashik-municipal-election
nashik-municipal-election

नाशिक - नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीचा नारळ फोडण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेचे संपर्कनेते संजय राऊत, भाजपकडून चंद्रकांत पाटील व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिकवाऱ्या वाढल्या आहेत.

भाजप-मनसेमध्ये युतीची खलबते -

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका होतील की नाही, याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी भाजप व मनसेकडून महाविकास आघाडीला शह देण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने मुंबईत युती झाल्यास नाशिकमध्येही भाजप-मनसे युतीची दाट शक्यता असल्याने त्यादृष्टीनेही चाचपणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांनी नुकताच एकाच दिवशी नाशिकचा दौरा केल्याने युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या इतिहासात सर्वपक्षीय सत्ता -

नाशिक महापालिकेसाठी आतापर्यंत एकूण सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. पुढच्यावर्षी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये पार पडणारी महापालिका निवडणूक ही सातवी पंचवार्षिक असणार आहे. नाशिक महापालिकेसाठी सर्वप्रथम 1992 मध्ये निवडणूक पार पडली होती. त्यावेळी महापालिका अगदीच नवी होती. त्यामुळे लोकसंख्या प्रभाग आदींची संख्या पाहता नियोजन अगदीच मर्यादित होते. नंतरच्या काळात महापालिकेचा पसारा चांगलाच वाढला. त्यामुळे हद्द, लोकसंख्या, वॉर्ड अशा विविध गोष्टींची त्यात भर पडत गेली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकांची गणिते बांधताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेवर सर्वपक्षीय सत्ता पाहायला मिळते. 1992 मध्ये महापालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आली. 1997 मध्ये अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने या महापालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी युती करुन निवडणूक लढवली. या महापालिकेवर युतीची सत्ता आली. त्यानंतर विविध पक्षांची महापालिकेवर सत्ता पाहायला मिळाली.

नाशिक महापालिकेवर 2012 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. त्यानंतर 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाची या महापालिकेवर सत्ता आली. आता 2022 मध्ये महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो याबाबत मोठी उत्सुकता आहे.

मनसेची मुसंडी -

नाशिककरांनी 2012 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) कौल दिला आहे. मनसेने 40 जागांवर विजय मिळवून सत्ता हातात घेतली. शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळे याचा फायदा राज ठाकरे यांनी घेतला. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ल्यातच राष्‍ट्रवादीचे घड्याळ मागे पडले व मनसेने मुसंडी मारली. महापालिकेच्या 122 जागांसाठी 929 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. . मनसेच्या सत्ताकाळात पहिल्या टर्ममध्ये भाजप आणि मनसेची युती होती. परंतु, दुसऱ्या टर्ममध्ये ती फिस्कटली होती. त्यानंतर मनसेने पाच वर्षाच शहरातील बाग-बगीचे व रस्ते विकसित केले. महाराष्ट्रातील पहिली बॉटिनिकल गार्डन तयार करून त्याचे उद्घाटन रतन टाटांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिकमध्ये मनसेला घरघर, मात्र यावेळी किंगमेकरची संधी -

एकेकाळी शहरात मनसेचे तीन आमदार व ४० नगरसेवक होते. जिल्हा परिषदेत चार सदस्य व पंचायत समितीदेखील मनसेच्या ताब्यात आल्याने नाशिक मनसेचा गड होता. परंतु, कालांतराने पक्षाला घरघर लागली. पुढे एक-एक करत मनसचे नगरसेवक अन्य पक्षात प्रवेशकर्ते झाले. २०१७ च्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या पाचपर्यंत खाली घसरली. या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात ठोस अशी कामे न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मनसेला पुन्हा कमान किंगमेकर म्हणून भूमिका बजावण्याची संधी असल्याने त्यादृष्टीने राज ठाकरे यांच्याकडून नियोजन सुरू आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजप युतीचीदेखील चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

महापौर निवडणुकीनंतर स्थायी समिती निवडणुकीतही मनसेची भाजपला साथ -

फेब्रुवारी 2021 मध्ये महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ दिल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रिपणे निवडणुका लढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. सध्या नाशिकमधील भाजप व मनसेच्या नेत्यांतील जवळीक अधिकच वाढली असून, शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे स्वबळावर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला भाजप-मनसे आघाडी कडवी झुंज देणार असल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मनसे-भाजपची जवळीक -

राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण तयार झाल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपसोबतचे संबंध वाढवले आहेत. शिवसेनेने मुंबईतील मनसेचे सात नगरसेवकही आपल्या गोटात सहभागी करून घेतल्याने नाराज मनसेने आता भाजपची साथ धरली आहे. मुंबईपाठोपाठ नाशिकमध्ये देखील मनसे आणि भाजपचे संबध अधिक घट्ट होत आहेत. नाशिकमध्ये स्थायी समितीत समसमान संख्याबळामुळे भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने जोरदार झटका दिला. महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसेने टाळी दिली. मनसेचा एकमेव सदस्य सलीम शेख भाजपच्या गोटात सहभागी झाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. महापौर, स्थायी समितीतीत भाजप आणि मनसेत झालेले मनोमिलन आता महापालिका निवडणुकीतही कायम राहील, अशी चर्चा दोन्ही पक्षांत सुरू झाली आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला मनसेची गरज -

कधीकाळी नाशिक हा मनसेचा गड होता. तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता मिळाल्यानंतरही अल्पकाळात मनसेचे पतन झाले. त्यानंतर पक्षाची वाट अधिक बिकट झाल्यामुळे मनसेला देखील भाजपच्या मदतीची गरज आहे. मनसेच्या सत्ताकाळात पहिल्या टर्ममध्ये भाजप आणि मनसेची युती होती. परंतु, दुसऱ्या टर्ममध्ये ती फिस्कटली होती. पुढे महापौर आणि स्थायी समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांची जवळीक अधिकच वाढल्यामुळे आगामी महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी चर्चा नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून, भगवा फडकवण्याचे मनसुबे उधळे जाण्याची शक्यता आहे.

दोघांना एकमेकांची गरज -

मोदी विरोध ते हिंदुत्वाच्या समर्थनामुळे पुन्हा भाजपशी जवळीक, असे राज ठाकरेंबाबतचे बदलणारे मतप्रवाह नाशिककरांनी देखील बघितले आहे. त्यामुळे आता राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह आगामी काळातील दहा महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मनसेचा शहरी भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा वारू रोखण्यासाठी भाजपला मनसेची गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकच नव्हे तर राज्यातही मनसे आणि भाजप अशी युती महापालिका निवडणुकीत दिसली तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर युतीची चर्चा आता दोन्ही पक्षांत सुरू झाली

युतीबाबत काय म्हणतात भाजप प्रदेशाध्यक्ष -

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे शक्य नाही. आमची जुनी ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही पाटील म्हणाले.

फडणवीसांचे सूचक वक्तव्य -

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत तसे संकेत देखील दिले आहेत. या विषयी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की या सर्व प्रक्रियेला अजून वेळ असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. आगामी महानगर पालिका निवडणुकीत मनसे सोबत युतीचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, मात्र याला अजून त्याला वेळ असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. चंद्रकांत दादांचे वक्तव्य नीट समजून घेतले पाहिजे. एका रात्रीत काहीही घडू शकते हा त्यांनी दिलेल्या संकेताचा अर्थ जो तुम्हाला वाटतोय तोच असल्याचे पत्रकारांना सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेंस वाढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.