ETV Bharat / city

ED Raid in Nagpur : कोण आहे ईडीच्या रडारावरील वकील सतीश उके? 'या' प्रकरणांमध्ये उके यांची महत्त्वाची भूमिका

author img

By

Published : Mar 31, 2022, 10:51 AM IST

Updated : Mar 31, 2022, 11:36 AM IST

फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर गंभीर केल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. भाजपा नेत्यांवर आरोप करून न्यायालयात याचिका दाखल करणारे आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वकील सतीश उके ईडीच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

sathish uke
sathish uke

हैदराबाद - नागपुरातील वकील सतीश उके यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. उके यांनी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर गंभीर केल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. भाजपा नेत्यांवर आरोप करून न्यायालयात याचिका दाखल करणारे आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वकील सतीश उके ईडीच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कोण आहेत सतीश उके? - सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करतात. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तेव्हापासून उके हे सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहेत. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती. सतीश उके यांची राजकीय वर्तळात उठबस आहे. त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते.

संजय राऊतांशी तीनवेळा भेट - सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती. सतीश उके यांना महाविकास आघाडीशी जवळीक भोवली का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाचा पाठपुरावा - न्यायमूर्ती लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून ती हत्या आहे. परंतू तत्कालीन फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबले. न्यायालयात खोटे पुरावे सादर करून न्यायालयाचीही फसवणूक करण्यात आली. याबाबतचे सर्व पुरावे आता हाती आले असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करावा, अशी मागणी वकील सतीश उके यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी नागपूर शहरचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर एक हरकत याचिकाही दाखल केली होती. त्यात फडणवीस यांच्या कार्यकाळात न्यायालयापासून लवविण्यात आलेले सर्व पुरावे नमूद केले होते. त्याचप्रमाणे लोया प्रकरण उचलून धरल्याने माझ्याविरोधात अनेक खोट्या तक्रारी करण्यात येत असल्याचे उके यांनी सांगितले होते. शिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून लोया प्रकरणाचे सर्व पुरावे सादर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर सूडूबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचेही उके यांनी सांगितले होते.

फडणवीसांवर गंभीर आरोप - सतीश उके यांनी फडणवीसांवर देखील गंभीर आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे नागपुर मधील एक मोठे गुंड असून, ते कोणाही विरुद्ध काहीही षडयंत्र रचत असतात. फडणवीस हे कपटी आणि बहुरंगी आहेत, असा आरोप वकील सतिष उके यांनी केला होता. नागपुर मधील मोक्याची 300 कोटींची जागा मिळवण्यासाठी निमगडे यांचा खून करण्यात आलेला होता. निमगडे यांची हत्या झाली तेव्हा फडणवीस हे गृहमंत्री होते. त्यामुळे रणजित सफेलकर यांना फडणवीस यांनी पूर्णपणे संरक्षण दिले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे फडणवीसांनी निवडणुकीत शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा - नागपुरात देवेंद्र फडणवीसांवर अनेक गुन्हे दाखल - वकील सतीश उके

चंद्रशेखर बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप - बावनकुळे यांचा नातेवाईक सुरज तातोडे बावनकुळेंवर अनेक कंत्राटदारांकडून कमिशन घेतल्याचा आरोप केला होता. तातोड हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यरत होता. मंत्रीपदावर असताना त्याला जवळपास 25 हजार महिना पगार मिळत होता. अनेक रस्त्याच्या कंत्राटदार कंपन्यांकडून कोट्यावधीच्या रक्कमेची वसुली आणि त्याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. जवळपास शंभर कोटी रुपयांच्यावर वसुली केल्याचा आरोप तातोड यांनी केला. वकील सतीश उके यांनी सुरज यांना सोबत घेत पत्रकारपरिषदेत या आरोपाचे खुलासे केले होते. तसेच याप्रकरणाची चौकशी करून बावनकुळेंवर कारवाई करण्याची मागणी उके यांनी केली होती.

हेही वाचा - Allegations of Corruption : नातेवाईकानेच केले भ्रष्टाचाराचे आरोप, बावनकुळें विरोधात दावा दाखल करणार

गावगुंड मोदीला आणले समोर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदारसंघात मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर वादंग उठले होते. मात्र आपण पतंप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोललो नसून मतदारसंघातील एका गावगुंड मोदीबद्दल बोललो असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले. त्यानंतर या गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणण्यात वकील सतीश उके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वकील सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील मानले जातात.

Last Updated :Mar 31, 2022, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.