ETV Bharat / city

राज्यात निर्बंध लावण्यासंदर्भातील चर्चा अद्याप नाही; मंत्री वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Sep 7, 2021, 9:20 PM IST

Updated : Sep 7, 2021, 9:55 PM IST

Vijay Wadettiwar
मंत्री वडेट्टीवार

अद्याप तरी मुख्यमंत्री यांनी निर्बंध लावण्याची भूमिका घेतली नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मात्र, निर्बंध लागतीलच असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत सांगितले होते.

नागपूर - महाराष्ट्रासह नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याच्या विषयावर अजूनही कुठलीही चर्चा मुख्यमंत्री किंवा कॅबिनेटच्या बैठकीत झाली नाही. अद्याप तरी मुख्यमंत्री यांनी निर्बंध लावण्याची भूमिका घेतली नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मात्र, निर्बंध लागतीलच असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत सांगितले होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

येत्या दोन ते तीन दिवसात निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. पण दुसरीकडे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र निर्बंध लावण्याचा तूर्तास कुठलाच निर्णय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पुढील आणखी काही दिवस निर्बंध लागणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच निर्बंध लावणे आणि कमी करण्याचे सर्व अधिकार जरी त्या विभागाचा मंत्री म्हणून असले तरी अधिकार हे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला आहेत, असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

  • तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने काळजी घ्यावी -

येत्या काळात सण-समारंभ पाहता टास्क फोर्स आणि तज्ज्ञ मंडळींशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे. ती काळजी प्रशासनासह सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. तिसरी लाट येत असताना लोकांनी नियमांचे पालन न केल्यास रुग्ण वाढल्यास निर्बंध लावावे लागतील, असे सुतोवाचसुद्धा मंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे.

हेही वाचा - मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 8 कोटी 73 लाख रुपयांचा गंडा

  • नितीन राऊत म्हणाले होते की...

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसात कडक निर्बंध लावण्यात येतील असे वक्तव्य पालकमंत्री राऊत यांनी केले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली की नाही याबद्दल माहिती नाही. पण कदाचित झाली असेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल, याबद्दल माहिती घेऊन सांगतो, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही असा समज निर्माण केला जात होता. तारखा दिल्या जात होत्या, तीन पक्षांचे सरकार सरकार हे आता घट्ट सरकार झाले आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा भी नही, छुटेगा नही, अशा मिश्किल शब्दात वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.

  • भाजप आमदार पडळकर यांच्यावर खोचक टीका -
    मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

भाजप आमदार पडळकर हे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. छत्तीसगडमध्ये वडेट्टीवार यांची दारूची फॅक्ट्री असल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्यानंतर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला होता. यावर बोलताना वडेट्टीवर म्हणाले की, वकिलांशी बोलणे झाले असून दावा करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. पडळकर यांना कुठून स्वप्नं पडतात? ते फार महान माणूस आहे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तो टीका करतो. दीड वर्ष शिक्षा भोगून कारागृहात राहून आलेला माणूस फार पुण्याचे काम करून आला आहे, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला. त्याच्या काय तोंडी लागायचे, ज्याने शपथ घेऊन सांगितले की माझा बाप उभा राहिला तरी भाजपला मत देत नाही असे म्हणणारे भाजपमध्ये आहेत, त्या महान व्यक्तीबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

  • सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू -

ईडी, सीबीआय हे बंगाल आणि महाराष्ट्रासाठी सुरू केले का? असाच समज सगळ्यांचा झालेला आहे. कारण इतर कोणत्याच राज्यात ईडीची कारवाई होताना दिसत नाही. सरकार येत असतात जात असतात, आकसातून कुठलीही कारवाई होऊ नये. जे होत आहे ते राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

  • राज ठाकरेंची भूमिका झेंडा बदलल्याप्रमाणे -

राज्य सरकारचा महानगर पालिकेवर प्रशासक बसून ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. राज साहेबांची भूमिका झेंडा बदलल्यासारखी असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा - 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सीईटी परीक्षा होणार - मंत्री सामंत

Last Updated :Sep 7, 2021, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.