ETV Bharat / city

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून घोषणांची हवाबाजी; काँग्रेसचा आरोप

author img

By

Published : Aug 31, 2021, 4:35 PM IST

Updated : Aug 31, 2021, 4:50 PM IST

केवळ स्वप्नांचा पाऊस आणि लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केला असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांनी केला आहे.

नागपूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीला सध्या सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र सध्याच्या नागपूरच्या स्थानिक राजकारणात बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे आहे. नवनियुक्त महासचिवांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितीन गडकरी यांच्या डोक्यात आलेल्या कल्पनेवर डोळे झाकून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र ती कल्पना कधीही सत्यात उतरत आणि पूर्णत्वास जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. केवळ स्वप्नांचा पाऊस आणि लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केला असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांनी केला आहे. आम्ही विकासाचे विरोधक नाहीत, मात्र आर्थिकदृष्ट्या परवडणारा विकास आणि त्यावर राजकारण केल्यास जनतेचे भले होईल, असा टोलादेखील काँग्रेस नेत्यांनी गडकरी यांना लगावला आहे.

गडकरींवर टीका

दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना नागपूरच्या जनतेला महानगरपालिका निवडणुकीत मतांचे बक्षीस देण्याचे आवाहन केले होते. त्यावर आक्षेप घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केला. चार दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील सुमारे डझनभर कार्यकर्त्यांना विविध पदे दिली आहेत. त्यामध्ये बहुतांश कार्यकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदाची जबाबदारी दिली आहे. त्या सर्वांना एकत्र घेऊन शहराध्यक्ष असलेले आमदार विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

'पदवीधर निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होणार'

विकास ठाकरे या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरच्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला पराभवाचा धक्का देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बक्षीस दिले असल्याचा चिमटा ठाकरे यांनी काढला आहे. पदवीधर निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा भाजपाला पराभवाची भीती वाटत असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

'नागपुरात दर्जेदार रस्ते नाहीत'

काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी नागपूर शहरातील आऊटर रिंग रोडचे रस्ते दर्जेदार नसल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी 265 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून बांधलेले आउटर रिंग रोड भ्रष्ट कारभाराचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे २४ तास पाणीपुरवठा योजनादेखील अनेक वर्षांपासून पूर्णत्वास गेली नसल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे.

Last Updated : Aug 31, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.