ETV Bharat / city

रेल्वेतील सर्वाधिक लांबीची भूमिगत जल वाहिनी होतेय तयार; पावसातही रेल्वे सुरू राहणार असल्याचा दावा

author img

By

Published : Jun 17, 2021, 8:36 PM IST

Updated : Jun 19, 2021, 10:54 PM IST

दरवर्षी पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प होते. त्यामुळे, मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होते. मात्र, आता पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी साचणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून अत्याधुनिक मायक्रो-टनेलिंग पद्धतीने पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येत आहेत.

Micro Tunnel Central Railway
सँडहर्स्ट रोड मायक्रो टनेल

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प होते. त्यामुळे, मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होते. मात्र, आता पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी साचणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून अत्याधुनिक मायक्रो-टनेलिंग पद्धतीने पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेतील सर्वाधिक लांबीचा मायक्रो टनेलिंग सँडहर्स्ट रोड स्थानकांवर करण्यात येत आहे. जुलै महिन्यात यांचे काम सुद्धा पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी आणि उर्मी ट्रेंचलेस टेक्नॉलॉजी प्रा. कंपनीच्या महाव्यवस्थापक

हेही वाचा - मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा लादणार नाही - महापौर

लोकल सेवा ठप्प होणार नाही

मध्य-पश्चिम रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून मान्सूनपूर्व कामे रेल्वेकडून युद्धपातळीवर करण्यात येतात. मात्र, तरी सुद्धा रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या घटना घडतात. परिणामी लोकल सेवा ठप्प होते. ही समस्या कायमची दूर व्हावी याकरिता आतापर्यंत रेल्वे आणि महापालिकेकडून असंख्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात परिस्थितीत काही सुधार होताना दिसून येत नाही. यंदा तर पहिल्याच पावसता रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईची उपनगरीय लोकल सेवा तब्बल साडे नऊ तास बंद होती. त्यामुळे, रेल्वे आणि महापालिकेचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र, आता रेल्वे रुळावर पाणी साचू नये यासाठी महत्वपूर्ण पाऊल रेल्वेने टाकलेले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सात ठिकाणी अत्याधुनिक मायक्रो टनेलिंगच्या माध्यमातून भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येत आहे.

काय आहे मायक्रो टनेलिंग?

मुंबई, उपनगरांत दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो, तसेच पावसातच समुद्राला आलेल्या भरतीमुळे काहीच कालावधीत मुंबईच्या सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडतो. रेल्वे रुळाच्या बाजूचा नाल्यातून पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळे, रेल्वे रुळावर पाणी साचते. या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा याकरिता पावसाचे पाणी साचणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूला अत्याधुनिक मायक्रो टनेल बोरिंग मशीनच्या (एमटीबीएम) माध्यमातून भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. हे काम एका खासगी कंपनीकडून करण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेतील सर्वाधिक लांबीचे मायक्रो टनेल

उर्मी ट्रेंचलेस टेक्नॉलॉजी प्रा. कंपनीचे महाव्यवस्थापक सुनीता सिंग यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, मायक्रो-टनेलिंगचे सध्या काम सँडहर्स्ट रोड आणि मस्जीद रेल्वे स्थानकादरम्यान सुरू आहे. हे काम करत असताना रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. अत्यंत योग्य पद्धतीने हे काम सुरू आहे. या कामासाठी मायक्रो टनेल बोरिंग मशीन, म्हणजे एमटीबीएम रेल्वे वापरत आहे. त्याचा वापर करून सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ भारतीय रेल्वेतील सर्वाधिक लांबीचे मायक्रो टनेल बनवण्यात येत आहेत. स्टेशनपासून थेट अरबी समुद्रापर्यंत आम्ही एमटीबीएमने खोदून त्यात मोठे पाईप टाकत आहोत. हे पाईप 1.8 व्यासाचे आहेत, तर मायक्रो टनेलची एकूण लांबी 470 मीटर इतकी आहे. हे काम जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

सात स्थानकात उभारणार मायक्रो टनेलिंग

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सांगितले की, मायक्रो टनेल बोरिंग मशीनच्या (एमटीबीएम) माध्यमातून दोन ठिकाणी भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात आलेल्या होत्या. यंदा त्या ठिकाणी पाणी साचले नाही. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील जिथे पावसाचे पाणी साचते, अशा सात स्थानकांत मायक्रो टनेलिंग
तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कुर्ला, विद्याविहार, सँडहर्स्ट रोड, मशीद, वांद्रे, वसई आणि नालासोपारा येथे मायक्रो-टनेलिंग पद्धतीने ७ अतिरिक्त भूमिगत पर्जन्य जल वाहिन्या तयार करण्यात येणार आहे. यातील सँडहर्स्ट रोड आणि मस्जीद बंदर स्थानकात मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण होत आले आहे. तर, येणाऱ्या काळात प्रकल्प तयार झाल्यास मुंबई लोकल पावसात देखील थांबणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा - नागपुरात अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी 200 प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

Last Updated : Jun 19, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.