ETV Bharat / city

तौक्ते वादळ : बीकेसी कोविड सेंटरमधील 182 रुग्ण सुरक्षित; लवकरच रुग्णसेवा पुन्हा सुरू करू - डॉ. राजेश ढेरे

author img

By

Published : May 17, 2021, 1:41 PM IST

निसर्ग चक्रीवादळाचा इशारा मिळाल्याबरोबर पालिकेने बीकेसी कोविड सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 182 रुग्णांना सायन, सेव्हन हिल्स आणि नेस्को कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तर पालिकेचे पुढील निर्देश आल्यानंतर रुग्णसेवा सुरू केली जाणार आहे.

बीकेसी कोविड सेंटरमधील 182 रुग्ण सुरक्षित
बीकेसी कोविड सेंटरमधील 182 रुग्ण सुरक्षित

मुंबई - मागच्यावर्षी निसर्ग वादळाचा मोठा फटका बीकेसी कोविड सेंटरला बसला होता. तर रुग्णांचेही मोठे हाल झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेता तौक्ते चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर शनिवारीच येथील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून रुग्ण इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली. तर दुपारपर्यंत 182 रुग्ण सायन, सेव्हन हिल्स आदी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण सुरक्षित आहेत, अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी दिली आहे. तर लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशानुसार येथे पुन्हा रुग्णसेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

बीकेसी कोविड सेंटरमधील 182 रुग्ण सुरक्षित

मागच्या वर्षी मोठा फटका

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून सुमारे 2000 बेड्सचे ट्रँझिट जम्बो कोविड सेंटर दोन टप्प्यात गेल्या वर्षी उभारण्यात आले होते. हे सेंटर बीकेसीतील मोकळ्या मैदानावर असून मिठीनदीपासून जवळ आणि सखल भागात आहे. त्यामुळे साहजिकच अनेकदा पावसाळ्यात या सेंटरच्या बाहेर वा सेंटरमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तर गेल्या वर्षी जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळ आले होते. या वादळाचे मोठे परिणाम मुंबईवर झाले होते. वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे या सेंटरमध्ये पाणी साचले होते, चिखल झाला होता. त्यामुळे रुग्णांना मोठी कसरत करत इतर ठिकाणी हलवावे लागले होते.

भाजपचा आघाडी सरकारवर निशाणा

गेल्या वर्षी 242 रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर कोविड सेंटरला किती आणि कसा फटका बसला आहे याचे फोटो-व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावर टाकत यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. पण पालिकेने मात्र कोविड सेंटरला निसर्ग वादळाचा मोठा फटका बसल्याच्या सर्व अफवा असून सेंटरचे तुरळक नुकसान झाल्याचे स्पष्ट केले होते. महत्वाचे म्हणजे निसर्ग वादळ गेल्यानंतर तीन-चार दिवसांतच पुन्हा येथे रुग्ण सेवा सुरू करण्यात आली होती.

दोन दिवसांपासून सुरु आहेत कोविड सेंटरमध्ये आवश्यक उपाययोजना

निसर्ग चक्रीवादळाचा इशारा मिळाल्याबरोबर पालिकेने बीकेसी कोविड सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 182 रुग्णांना सायन, सेव्हन हिल्स आणि नेस्को कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तर आता पालिकेचे पुढील निर्देश आल्यानंतर रुग्णसेवा सुरू केली जाणार आहे. आज सकाळपासून मुंबईत वादळाचा परिणाम सुरू झाला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, वाऱ्याचा जोरही कायम आहे. पण अजून तरी (दुपारी पर्यंत) पाणी साचणे वा चिखल होण्याच्या किंवा इतर कोणत्याही मोठ्या घटना घडल्या नाहीत. मात्र कोविड सेंटरच्या कंपाऊडचे थोडे नुकसान झाले आहे. कंपाऊंडच्या काही पत्र्यांची पडझड झाल्याची माहिती डॉ. ढेरे यांनी दिली आहे. दरम्यान रुग्णांना वेळीच हलवण्यात आल्याने, कोविड सेंटर प्रशासनाच्या अडचणी कमी झाल्या आहेत. तर डॉ. ढेरे आणि त्यांची टीम दोन दिवसापासून कोविड सेंटरमध्ये तळ ठोकून आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत.

हेही वाचा - गोव्यात आणखीन ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू , कोरोनाचा कहर थांबेना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.